मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कर्करोगाने निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. गेल्यावर्षी त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली होती.

डॉ. देशमुख यांची १४ जानेवारी २०१९ रोजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक ही पदेही त्यांनी भूषवली होती. इंग्रजी विषयात त्यांनी पीएच.डी केली होते. त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिवपद दीर्घकाळ रिक्त होते.

विद्यापीठासमोर अनेक आव्हाने असताना डॉ. देशमुख यांनी विद्यापीठाची धुरा सांभाळली. अवघ्या वर्षभराच्या कालावधीतही त्यांनी विद्यापीठाच्या कामकाजाची घडी बसवली.  करोनाच्या प्रादुर्भावातही विद्यापीठातील अनेक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी ते प्रयत्नशील होते.

गेल्या महिन्याभरापासून ते कर्करोगावर उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. आज, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. देशमुख यांनी अल्पावधीतच विद्यपीठाच्या प्रशासकीय आलेखात त्यांचे अमुल्य योगदान लाभले. महत्त्वपूर्ण निर्णयांची त्यांनी यशस्वी अंमलबजावणी केली. त्यांच्या अकाली निधनामुळे विद्यापीठाचे अपरिमित नुकसान झाले आहे.

– प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यपीठ

डॉ. देशमुख हे अत्यंत मनमिळावू आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व होते. विद्यपीठ प्रशासकीय बाबींचा सखोल अभ्यास, संभाषण कौशल्य, प्रशासनिक कौशल्यांच्या जोरावर प्रशासनात गतिमानता आणली होती.

– प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू, मुंबई विद्यपीठ