चहुबाजूंनी झालेल्या टीकेपुढे नमते घेत मुंबई विद्यापीठाने डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन रद्द केले खरे; पण निलंबनाबद्दलची आपली भूमिका योग्य असल्याचा दावा करत ‘गिरे तो भी..’चा प्रत्यय दिला आहे. तर दुसरीकडे, हातेकर यांचे निलंबन रद्द झाले असले तरी विद्यार्थी संघटनांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देत मुंबई विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रा. हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रक काढले आहे. कुलगुरूंनी प्रा. हातेकर यांच्या तडकाफडकी केलेल्या निलंबनाच्या कारवाईची उपस्थित सर्व सदस्यांनी या बैठकीत योग्य म्हणून एकमताने भलामण केल्याचे या पत्रकात म्हटले आहे. प्रा. हातेकर यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसतानाही संस्था, विद्यार्थिहित आणि लोकभावनांचा विचार करून अन्याय झाल्याची भावना दूर करण्यासाठी डॉ. हातेकर यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी शिफारस करण्यात येत आहे, अशी भूमिका यात विद्यापीठाने घेतली आहे.
हातेकर यांनी केलेल्या १६ मुद्दय़ांची चौकशी करण्यासाठी कुलगुरूंनी नेमलेल्या एका सदस्यीय सत्यशोधन समितीने या वेळी व्यवस्थापन परिषदेसमोर अहवाल सादर केला. प्रा. हातेकर यांच्या निलंबनानंतर उठलेल्या वादळाच्या पाश्र्वभूमीवर ही सत्यशोधन समिती कुलगुरूंनी नेमली होती. या समितीने डॉ.हातेकर यांनी प्रसारमाध्यमांमधून उपस्थित केलेल्या १६ मुद्दय़ांचे माहिती व पुराव्यांच्या आधारे खंडन केले. त्यामुळे परिषदेची बैठक तब्बल १० तास चालली, असा दावाही विद्यापीठाने केला आहे. ‘बुक्टू’ या शिक्षकांच्या संघटनेतर्फे व्यवस्थापन परिषदेत प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. मधू परांजपे आणि प्रा. वसंत शेकाडे यांनी मात्र अन्य सदस्यांच्या तुलनेत वेगळी भूमिका मांडत प्रा. हातेकर यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहणार
प्रा. हातेकर यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असला तरी त्यामुळे विद्यापीठात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन शांत होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण, ‘प्रा. हातेकर यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी हे विद्यापीठाचा शैक्षणिक व प्रशासकीय कारभार सुधारण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा व्यापक भाग आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मागण्यांची सनद राज्यपाल के. शंकरनारायणन यांनाही सादर करण्यात आली आहे. या मागण्यांची तड जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील,’ अशी भूमिका आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी घेतली आहे.