नमिता धुरी

मुंबई विद्यापीठाच्या दोन प्राध्यापकांचे सेवानिवासातील वास्तव्य सध्या वादात सापडले आहे. सेवा समाप्तीनंतरही सेवानिवासाच्या भाडय़ाचे लाखो रुपये थकवून गेली अनेक वर्षे हे प्राध्यापक येथे राहात आहेत. सेवा निवासासाठी अनेक प्राध्यापक प्रतीक्षा यादीत असताना या प्राध्यापकांवर अद्याप कारवाई का झालेली नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

डॉ. बी. व्यंकटेश कुमार हे आरजीसी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ३१ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची विद्यापीठातील सेवा समाप्त झाली. मात्र अजूनही त्यांनी बंगल्यावरील ताबा सोडलेला नाही. त्यांच्या नावावर १८ लाख ५८ हजार २२४ रुपये इतकी थकबाकी आहे. आंबेडकर स्टुडण्ट्स असोसिएशनला माहितीच्या अधिकाराखाली विद्यापीठाने ही माहिती दिली आहे. डॉ. अभय पेठे ३० नोव्हेंबर २०१७ रोजी अर्थशास्त्र विभागातून निवृत्त झाले. त्यांच्या नावावर ३ लाख ४८ हजार ३०० रुपये थकबाकी आहे. विद्यापीठाने नमूद केलेली थकबाकी ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंतची आहे.

‘मी ‘टाटा समाजविज्ञान संस्था’ (टीस) येथे काम करत आहे. तसेच शासनाच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवरही काम करत आहे. माझी पत्नी, वृद्ध आईवडिल आणि शाळकरी मुली विद्यापीठाच्या बंगल्यात राहात आहेत. त्यामुळे मी कुलगुरुंना पत्र लिहून विशेष परवानगी मागितली आहे’, असे स्पष्टीकरण डॉ. बी. व्यंकटेश कुमार यांनी दिले आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कुमार यांना ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना’ची जबाबदारी दिली आहे. याचा हवाला देत त्यांनी पूर्वीच्या कुलगुरुंकडून बंगल्यातील वास्तव्य कायम राखण्याची परवानगी मिळवली होती. त्याची मुदत गेल्या वर्षी संपल्याने आणखी चार वर्षांंची मुदत कुमार यांनी नव्या कुलगुरुंना पत्र लिहून मागितली आहे. डॉ. अभय पेठे यांचे म्हणणे आहे की, निवृत्तीनंतर त्यांची ‘वरिष्ठ निवासी सहकारी’ (सिनिअर रेसिडेन्ट फेलो) या पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली. त्याअंतर्गत घरातील वास्तव्य कायम राखण्याची तरतूद आहे.

मात्र पेठे यांची नियुक्ती राज्य शासनाच्या एका प्रकल्पासाठी झाली असून त्यासाठी अर्थशास्त्र विभागाला सरकारकडून निधी मिळत आहे. त्या निधीतूनच त्यांच्या विभागाने बंगल्याचे भाडे भरणे अपेक्षित आहे. मात्र ते विभागाने भरलेले नाही, अशी माहिती विद्यापीठाचे निबंधक अजय देशमुख यांनी दिली.

कुमार यांच्याबाबतही आपण माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आठवडाभराच्या मुदतीनंतरही त्यांच्याकडून उत्तर मिळू शकलेले नाही. आंबेडकर स्टुडण्ट्स असोसिएशनने याबाबत निवेदन दिले असून कुलगुरुंच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही देशमुख यांनी दिले आहे.