विद्यापीठातील बडय़ा अधिकाऱ्यांची नावे उघड होण्याची शक्यता
मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचा घोटाळा केवळ एकाच शाखेपुरता मर्यादित नसून तो इतरही शाखांमध्ये सर्रास सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. विद्यापीठातील अनेक कर्मचारी या घोटाळ्यात गुंतले असून काही बडय़ा अधिकाऱ्यांचीही नावे यात पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी पकडलेल्या आठ जणांची कसून चौकशी सुरू असून त्यातून विद्यापीठाला हादरा देणारा महाघोटाळा उघडकीस येईल, असे सूत्रांकडून समजते. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर विद्यापीठाने सत्यशोधन समितीची स्थापना करत चौकशी अहवाल तयार केला आहे. समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे आज, सोमवारी कारवाई करण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी परीक्षेच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना घरी लिहिण्यास देऊन त्यांच्याकडून १५ ते २० हजार रुपये प्रत्येकी उकळण्यात येत होते. या घोटाळ्याचा पर्दाफाश भांडुप पोलिसांनी शनिवारी केला. पोलिसांनी एका विद्यार्थ्यांसह आठ जणांना अटक केली असून यात कंत्राटी लिपिकांचाही समावेश आहे. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या संमतीनेच हा घोटाळा निर्धोकपणे सुरू असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आठ जणांच्या चौकशीत अनेक बडय़ा अधिकाऱ्यांची नावे पुढे येतील, अशी माहिती पोलिसी सूत्रांनी दिली.
तसेच हा प्रकार केवळ अभियांत्रिकीच नव्हे तर इतर शाखांच्या बाबतीतही होत असल्याची खात्रीलायक माहिती स्पष्ट होत आहे. एकीकडे पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अटक केली असताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी शनिवारी सत्यशोधन समितीची स्थापना करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
या समितीचे निमंत्रक डॉ. सिद्धेश्वर गडदे, समन्वयक, वाणिज्य शाखा, डॉ. सुरेश उकरंडे, समन्वयक, अभियांत्रिकी शाखा, प्रा. विनायक दळवी आणि माजी परीक्षा नियंत्रक प्रा. डॉ. विलास िशदे यांचा या समितीमध्ये समावेश होता. रविवारी दुपारी १२.३० वाजता समितीची बैठक झाली. त्यानंतर समितीने तिचा चौकशी अहवाल परीक्षा मंडळाकडे सुपूर्द केला. परीक्षा मंडळाची तातडीची बैठक सायंकाळी ४.३० वाजता बोलावून समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेत त्यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच दोषींवर सोमवारीच कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यपालांनीही अहवाल मागवला
उत्तरपत्रिका घोटाळ्याची दखल राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनीही घेतली असून त्यांनी कुलगुरूंकडे सर्व प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला आहे.

घोटाळा झाल्यानंतर सुधारणेचे गाडे
घोटाळा उघडकीस आल्यानंतर इभ्रत चव्हाटय़ावर मांडली गेल्यानंतर विद्यापीठाने कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे सूतोवाच केले आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासकीय सुधारणांसहित आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर अवलंब करत परीक्षा भवन तसेच अन्य महत्त्वाच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे, त्यावर नियंत्रण करण्यासाठी कंट्रोल रूम, परीक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अ‍ॅक्सेस कंट्रोल आणि इंट्रजन (घुसखोरी) डिटेक्शन सॉफ्टवेअरमार्फत देखरेख इ. उपाययोजना करण्याचा मानस विद्यापीठाने व्यक्त केला आहे.