News Flash

पुनर्मूल्यांकनामुळे मुंबई विद्यापीठच नापास!

निकालपत्रावर नापासाचा शिक्का बसला की सगळे काही संपले, असे निदान मुंबई विद्यापीठाच्या बाबतीत तरी वाटून घ्यायला नको. कारण, या विद्यापीठाचे नापास होणारे हजारो विद्यार्थी पुनर्मूल्यांकनात

| April 30, 2014 04:17 am

निकालपत्रावर नापासाचा शिक्का बसला की सगळे काही संपले, असे निदान मुंबई विद्यापीठाच्या बाबतीत तरी वाटून घ्यायला नको. कारण, या विद्यापीठाचे नापास होणारे हजारो विद्यार्थी पुनर्मूल्यांकनात व फेरमोजणीत (रिटोटलिंग) उत्तीर्ण होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलत असले तरी त्यामुळे उत्तर पत्रिकांच्या तपासणीतील अंदाधुंदीही अधोरेखित झाली आहे. विद्यापीठाच्या या निकृष्ट कामाची किंमत विद्यार्थ्यांना मात्र फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन व फेरमोजणीच्या प्रक्रियेकरिता हजारो रुपये मोजून विनाकारण चुकवावी लागत आहे.
२०१२ आणि १३ या काळात विद्यापीठाकडे फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन व फेरमोजणीकरिता आलेले अर्ज आणि त्यानंतर जाहीर झालेल्या निकालाबाबत विहार दुर्वे यांनी माहितीच्या अधिकाराखाली परीक्षा विभागाकडून मिळविलेल्या आकडेवारीतून विद्यापीठाच्या मूल्यांकनातील हे अर्थसत्य बाहेर येण्यास मदत झाली आहे. अनुत्तीर्णाचे पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण होण्याचे प्रमाण पाहता ज्यांच्या केवळ गुणांमध्ये फेरफार होत असतील असे विद्यार्थी किती असतील, हा विचारही मती गुंग करणारा आहे. गुणांची फेरमोजणीही सदोष असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
पुनर्मूल्यांकनाचा व फेरमोजणीचा निकाल विद्यार्थ्यांकरिता लॉटरीच्या निकालासारखा ठरतो खरा. पण, या लॉटरीत आपणच गुंतवणूक करून नंतर तीच बक्षिसी म्हणून मिळविण्याचा प्रकार विरळाच.

एका शिक्षकाची प्रतिक्रिया
‘जे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी किंवा गुणांच्या फेरमोजणीसाठी अर्ज करतात ते फोटोकॉपीसाठी करतातच असे नाही. तसेच, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्यांतही ८० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण असतात. तर २० टक्के विद्यार्थ्यांना आपले गुण वाढू शकतील, अशी अपेक्षा असते,’ असे परीक्षा विभागाच्या माजी नियंत्रकांनी सांगितले. या २० टक्के विद्यार्थ्यांपैकी नेमक्या किती विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे, याची माहिती परीक्षा विभागाने दिलेल्या आकडेवारीत नाही. नाहीतर मूल्यांकनाचा निकृष्ट दर्जा आणखी ठळकपणे अधोरेखित झाला असता.
‘अॅप्लाइड मॅथ्स आणि मेकॅनिक्स या अभियांत्रिकीतील विषयांचा पहिल्या सत्राचा निकाल फारच कमी लागतो. या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनाकरिता अर्ज केल्यानंतर मात्र ७० ते ८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात,’ असेही निरीक्षण एका शिक्षकाने नोंदविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2014 4:17 am

Web Title: mumbai university failed after revaluation
Next Stories
1 रेल्वे तिकिटांची ‘तस्करी’ विमानमार्गे
2 खासगी तंत्रशिक्षण महाविद्यालयांच्या खर्चाला ४५ टक्क्य़ांची मर्यादा
3 ‘राष्ट्रपतीपदका’चा चौदा वर्षांचा वनवास संपला
Just Now!
X