मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडणे ही दरवर्षांची नित्याचीच बाब! मात्र १८६२मध्ये विद्यापीठाच्या पहिल्याच पदवी परीक्षेचा निकालच नव्हे, तर पदवीदान समारंभही झाला, तो केवळ दोन महिन्यांत! त्याचा रंजक किस्सा..

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे निकाल ४५ दिवस उलटून गेले तरी अद्याप लागले नाहीत, असे वृत्त काही दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ने अगदी पहिल्या पानावर प्रसिद्ध केले. ही मोठी आश्चर्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. कारण की, निकाल उशिरा लागणे यात खरे तर बातमी अशी काहीच नाही. मुंबई विद्यापीठाच्या दृष्टीने तो एक रुटीन प्रकार आहे. गेल्या वर्षीही काही शाखांचे निकाल रखडले होते. त्याआधीच्या वर्षीही तसेच झाले होते, त्याही आधीच्या वर्षी हेच घडले होते..

म्हणजे हा विद्यापीठाचा नित्याचा परिपाठ आहे तर!

तर ते तसे नाही. पूर्वी परीक्षा आणि निकाल यांचे वेळापत्रक व्यवस्थित पाळले जात असे. विद्यापीठाच्या पहिल्या पदवी परीक्षेत तर सुमारे दोन महिन्यांत परीक्षा आणि निकाल लागून पदवीदान सोहळाही पार पडला होता. ही गोष्ट १८५७ सालातली. खूपच छान किस्सा आहे तो.

तेव्हा देशात, खरे तर अधिक करून उत्तर हिंदुस्थानातील काही संस्थानांत, बंडाचा वणवा पेटला होता. हिंदू-मुस्लीम संस्थानिक आणि शिपाई मिळून इंग्रजांशी लढत होते. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता राहते की वाचते अशी स्थिती होती आणि त्याच वर्षी मुंबईत विद्यापीठाच्या स्थापनेची तयारी सुरू होती.

आपले ‘मुंबईचे वर्णन’कार गोविंद नारायण माडगावकर सांगतात – ‘या इलाख्यांत युनिव्हर्सिटीची (पंडित शाळा) स्थापना सन १८५७ मध्ये झाली. तेव्हापासून हे (म्हणजे ब्रिटिश) परोपकारी प्रोफेसर एतद्देशीय लोकांपैकीं काही विद्यार्थ्यांस इंग्रजी रिवाजाच्या उत्तम पदव्या मिळाव्या म्हणून त्यांस वारंवार उत्तेजन देत. आणि हा त्यांचा मनोरथ ईश्वराने पार पाडिला.’

म्हणजे काय झाले, तर सन १८६२ साली पदवीच्या अखेरच्या वर्षांची परीक्षा झाली. तो महिना होता मार्च. परीक्षा झाली ‘टौनहाला’मध्ये.

या पहिल्या पदवी परीक्षेला विद्यार्थी किती होते, तर सहा. माडगावकर सांगतात, ‘त्यापैकी हे पुढील चौघे गृहस्थ परीक्षेस उतरले. (ते म्हणजे -) रा. महादेव गोविंद (रानडे), रा. रामकृष्ण गोपाळ (भांडारकर), रा. बाळा मंगेश (वागळे), रा. वामन आबाजी (मोडक).’

हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधारक. ‘या विद्यर्थ्यांस ता. १ माहे मे सन १८६२ रोजीं टौनहालांत सभा भरून सर हेन्री बार्टल् फ्रियर यांच्या हांतानें ए. बी. नामक पंडित पदवी मिळाली. या सभेंत इंग्रज व एतद्देशीय श्रीमान् सरकारी हुद्देवाले शेटसावकार असे पुष्कळ गृहस्थ आले होते.’

म्हणजे परीक्षेनंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आत पदवीदान सोहळा झालाही. हल्ली विद्यार्थीसंख्या वाढली, हे खरे. परंतु सोयीसुविधाही तशाच वाढल्या आहेत. नसतील तर त्या वाढवता येतील. परंतु इच्छाशक्ती हवी. ती कोण आणि कोठून आणणार?

शिवाय त्या काळी एक बरे होते, तेव्हा स्वतंत्र परीक्षा विभाग नव्हता!

माहितगार