विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा शुल्कात दुपटीने वाढ; फेरपरीक्षा शुल्कात ९०० रुपयांची वाढ

मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा व फेरपरीक्षांचे शुल्क या सत्रापासून सुमारे दुपटीने वाढविले आहे. एकीकडे पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीचे शुल्क कमी केले असले, मात्र दुसरीकडे फेरपरीक्षांचे शुल्क दुपटीने वाढवून विद्यापीठाने विद्यार्थ्यांची फसवणूक केली असल्याचा सूर विद्यार्थीवर्गातून व्यक्त  केला जात आहे.

ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या गोंधळाचा फटका बसल्याने यावर्षी पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीचे शुल्क विद्यापीठाने निम्मे कमी केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचे शुल्क मात्र ६५० रुपयांवरून १५६० केले आहे. पुनर्मूल्यांकनाचा निकाल कधीपर्यंत जाहीर होणार याबाबत शाश्वती नसल्याने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षांचे अर्ज भरणेही अनिवार्य असणार आहे. ‘एकीकडे पुनर्मूल्यांकनाचे २५० रुपये आणि छायांकित प्रतीचे ५० रुपये या नव्या शुल्कनियमानुसार ३०० रुपयांची बचत झाली असली तरी फेरपरीक्षेच्या शुल्कामध्ये एकदम ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांला जवळपास ६०० रुपयांचा फटका सोसावा लागणार आहे. याचा अर्थ विद्यापीठाने आमची फसवणूक केली आहे,’ असे सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

‘गणित शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सुमारे ९० टक्के  विद्यार्थ्यांना केटी लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सध्याच्या परीक्षेसोबतच केटी परीक्षाही द्याव्या लागतात. विद्यापीठाने केलेली ही दुप्पट शुल्कवाढ आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. तसेत गणित शाखेसाठी प्रात्यक्षिक परीक्षाही नसते. त्यामुळे या विषयाच्या परीक्षा घेण्याचा खर्चही तुलनेने कमी असतो. त्यामुळे विद्यापीठाची ही शुल्कवाढ योग्य नाही,’ असे विज्ञान संस्थेच्या गणित विभागाचे प्रमुख डॉ. अनिल पेडगावकर यांनी व्यक्त केले आहे.

विद्यापीठाची परीक्षा शुल्कवाढ मागील उन्हाळी सत्रांसाठी प्रस्तावित होती. ऑनस्क्रीन मूल्यांकनचा खर्च आणि मूल्यांकनच्या दरामध्ये वाढ करण्याच्या हेतूने ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु त्या वेळेस या शुल्कवाढीला विरोध झाल्याने पुढील सत्रापासून लागू करण्यात येणाचा निर्णय त्या वेळी घेण्यात आला होता. त्यानुसार या शैक्षणिक वर्षांपासून ही शुल्कवाढ करत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांमध्येच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. तेव्हा ऐन परीक्षांच्या काळामध्ये शुल्कवाढीचे परिपत्रक आल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी ही शुल्कवाढ पुढील सत्रापासून लागू करण्यात आल्याचे रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास पेडणेकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, परीक्षा शुल्क वाढ विद्यापीठाने मागे घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन विज्ञान शाखेतील काही विद्यार्थ्यांनी मंगळवारी विद्यापीठाला दिले आहे.