अद्यापही अनेक महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना मुंबई विद्यापीठाने १० मार्चपूर्वी प्रथम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा उरकण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. त्यानंतर पुढील पाच दिवसांत महाविद्यालयांनी निकालही जाहीर करावेत अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे.

यंदा करोना प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षांचे निकाल, प्रवेश प्रक्रिया, पहिल्या सत्राची परीक्षा सर्वच प्रक्रिया लांबली. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये जेमतेम ५ ते ६ आठवडय़ांपूर्वीच प्रथम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू झाले आहेत. साधारण जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापासून कला (एमए), विज्ञान (एमएससी), वाणिज्य (एम.कॉम.) अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या अध्यापनाला सुरुवात झाली. अद्यापही अनेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत. मात्र, तरीही विद्यापीठाने १० मार्चपूर्वी परीक्षा संपवण्याच्या सूचना महाविद्यालयाला दिल्या आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना किमान १ तारखेपासून परीक्षा सुरू कराव्या लागतील. त्यामुळे राहिलेल्या चार-पाच दिवसांत अभ्यासक्रम उरकून विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्याव्यात, असा प्रश्न प्राध्यापकांनी उपस्थित केला आहे.

प्रात्यक्षिके नाहीतच

अद्यापही महाविद्यालये सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली नसल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके झालेली नाहीत. माहिती तंत्रज्ञान, संगणक अशा विषयांची प्रात्यक्षिकेही पूर्ण झालेली नाहीत. ‘प्रात्यक्षिके नाहीत, तासिकाही पुरेशा झालेल्या नाहीत असे असताना परीक्षा कोणत्या आधारे घ्यायच्या. झालेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा उरकणे हे विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे आहे,’ असे मत एका प्राध्यापकांनी व्यक्त केले.

‘यूजीसी’च्या नियमाचे उल्लंघन

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार किमान ९० दिवस अध्यापन कालावधी मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमानुसार विद्यार्थ्यांना किमान महिनाभर आधी परीक्षेची पूर्वकल्पना देणे अपेक्षित आहे. मात्र, या नियमांचा विचारच विद्यापीठाने केलेला नाही. गेल्या सत्रातही विद्यापीठाने परीक्षा उरकल्या होत्या. परीक्षांबाबत विद्यापीठ गंभीर नाही, अशी टीकाही एका प्राध्यापकांनी केली आहे.