मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील खडकपाडा भागात उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्राची अकृषीक जमीन (एन. ए.) करण्याची नस्ती गेल्या काही महिन्यांपासून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अडकून पडली आहे. त्यामुळे उपकेंद्राच्या जमिनीवर विद्यापीठाला बांधकाम करता येत नाही, अशी धक्कादायक माहिती मुंबई विद्यापीठाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने शिवसेनेच्या कल्याणमधील शिष्टमंडळाला शुक्रवारी दिली. कल्याण, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, भिवंडी, वाडा परिसरातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई विद्यापीठाचे कल्याण येथे उपकेंद्र सुरू व्हावे म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने मुंबई विद्यापीठाला गेल्या सात वर्षांपूर्वी सात एकर जमीन नाममात्र दराने दिली आहे. ही जमीन मिळताच विद्यापीठाने या जमिनीवर तात्काळ उपकेंद्र सुरू करण्याचे आश्वासन पालिका पदाधिकाऱ्यांना दिले होते.