विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुरवस्था; व्हरांडय़ात पुस्तके, प्रबंध पडून

मुंबई : विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट उपसून, अभ्यास करून तयार केलेले प्रबंध, संशोधन पत्रिका तसेच देशात दुर्मीळ असलेले ग्रंथ यांच्या अमूल्य ठेव्याची मुंबई विद्यापीठाच्या लेखी मात्र शून्य किंमत असल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाच्या कलिना शिक्षण संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची पार दुर्दशा झाली असून ग्रंथालयाच्या व्हरांडय़ातच धूळखात पडलेल्या या साहित्याचा ठेवा वाळवीने फस्त करण्यास सुरुवात केली आहे.

विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रंथालयातील पुस्तके, संदर्भ ग्रंथ, पन्नास वर्षे जुनी वृत्तपत्रे, नियतकालिके धूळ खात पडली आहेत. इथल्या अनेक ग्रंथांना वाळवी लागली आहे. विद्यापीठाच्या पीएचडीधारकांचे प्रबंध ‘शोधगंगा’वर टाकणे तर सोडाच, पण त्याच्या छापील प्रतीही जपून ठेवण्याची तसदी विद्यापीठाने घेतलेली नाही. ग्रंथालयाच्या व्हरांडय़ात पुस्तके आणि प्रबंध कोणत्याही देखभालीविना पडून आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही विद्यापीठ प्रशासन त्या गांभीर्याने घेत नसल्याचे विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे आहे.

या ग्रंथालयाच्या इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. या ग्रंथालयाच्या इमारतीच्या छताचे प्लास्टर काही ठिकाणी कोसळले आहे. अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी गळते. भिंतींना ओलावा जाणवतो. याशिवाय ग्रंथालयातील बाके तुटली आहेत. स्वच्छतागृहदेखील वापरण्यायोग्य अवस्थेत राहिलेली नाहीत. महिलांच्या स्वच्छतागृहाच्या खिडक्या तुटल्या आहेत.

ग्रंथालयाच्या दुरवस्थेबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, ग्रंथालय इमारतीच्या दोन भागांचे दुरुस्तीचे काम सुरू केल्याचे सांगितले. तिसऱ्या भागाच्या (सी विंग) दुरुस्तीसाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. पुढील तीन-चार महिन्यांत दुरुस्ती पूर्ण होईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

स्कॅनर धूळ खात

ग्रंथालयातील पुस्तके डिजिटल करण्यासाठी विद्यापीठात दोन वर्षांपूर्वी स्कॅनर खरेदी करण्यात आला. त्यासाठी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले. दिवसाला शंभर पुस्तके स्कॅन करण्याची या स्कॅनरची क्षमता आहे. मात्र तोदेखील धूळ खात पडून आहे. पुस्तकांच्या प्रतींची जपणूक नाहीच, त्याचे डिजिटल स्वरूपातही जतन करण्याची तसदी विद्यापीठ घेत नसल्याचे दिसत आहे.

ग्रंथालयाच्या दुरवस्थेबाबत तक्रारी करूनही विद्यापीठाने पुस्तकांचे स्थलांतर केलेले नाही. ग्रंथालयाची अशी अवस्था असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ग्रंथालय दुसऱ्या इमारतीत स्थलांतरित करण्याऐवजी एखादी दुर्घटना घडण्याची विद्यापीठ वाट पाहत आहे का?

– अ‍ॅड. वैभव थोरात, अधिसभा सदस्य, युवासेना