बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट कायमस्वरूपी मोडीत निघावे यासाठी पोलिस यंत्रणेकडे पुरेसा पाठपुरावा करण्यात विद्यापीठाला अपयश आल्याने गेली चार वर्षे विद्यापीठाच्या सही-शिक्क्यांची जवळपास ३०० बोगस गुणपत्रिका वा पदवी प्रमाणपत्रांची प्रकरणे दरवर्षी आढळतात.

खासगी कंपन्यात रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे अनेकदा विद्यापीठाकडे पडताळणीकरिता येतात. अनेकदा पोलिसांना संशय आल्यास तीही प्रकरणे चौकशीकरिता येतात. अशा सुमारे ३०० प्रकरणात विद्यापीठाच्या नावे बोगस प्रमाणपत्रे तायर केली जात असल्याचे आढळून आले आहे. यावर्षी एकूण २७८ खोटी प्रमाणपत्रे आढळून आली होती. ही सगळी प्रमाणपत्रे विद्यापीठाने पोलीसांच्या हाती चौकशीकरिता सोपवली आहेत. मात्र, या प्रकरणांचा विद्यापीठाकडून पाठपुरावा होत नसल्याने बोगस प्रमाणपत्रांच्या मुळाशी जाणे शक्य झालेले नाही.

२०१२-१३मध्ये विद्यापीठाला एकूण २५२ खोटी प्रमाणपत्रे आढळली. २०१३ला ही संख्या वाढून तब्बल ३५४ इतकी झाली, असे विद्यापीठाने विहार दुर्वे यांना माहितीच्या अधिकारातील माहितीत स्पष्ट झाले आहे. तसेच २०१५मध्ये २८०च्या आसपास खोटी प्रमाणपत्रे आढळली होती. तर या वर्षी १० ऑक्टोबपर्यंत एकूण २७८ बोगस प्रमाणपत्रे आढळली आहेत. जास्तीत-जास्त खोटी प्रमाणपत्र मिळण्याचे प्रमाण हे वाणिज्य विषयातील आहे. त्यानंतर कला, अभियांत्रिकी, विज्ञान आणि व्यवस्थापन या विषयांमध्ये बोगस प्रमाणपत्रे आढळून येतात. प्रमाणपत्रावरील साधारणपणे १३ मुद्दे तपासून प्रमाणपत्र खोटे आहे की नाही याची खातरजमा केली जाते.

विद्यापीठाबाहेर दुकान

मुंबई विद्यापीठाकडे वर्षांला साधारणपणे २५ हजार प्रमाणपत्रे पडताळणीसाठी येतात. अनेक खासगी कंपन्या, इतर देशातील कंपन्या, विद्यापीठे किंवा व्हिसासारख्या तत्सम कारणांकरिता ही पडताळणी होते. त्याला विद्यापीठाकडून पंधरा दिवसांमध्ये प्रतिसाद देणे अपेक्षित असते. मात्र, हे काम कधीच वेळेत होत नाही. त्यामुळे अनेक कंपन्या दलालांना पैसे मोजून विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेतात. अशी दुकानेच अनेकजण विद्यापीठाबाहेर मांडून बसले आहेत.