29 September 2020

News Flash

व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका फुटली

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार सुरूच

मुंबई विद्यापीठ ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार सुरूच

परीक्षेचे अर्ज भरण्यापासून निकालापर्यंत प्रत्येक टप्प्यावर भोंगळ कारभाराचेच नमुने सातत्याने समोर येणाऱ्या मुंबई विद्यापीठामध्ये आता पेपरफुटीचाही प्रकार समोर आला आहे. व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाचा ‘ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग’ या विषयाची प्रश्नपत्रिका गुरुवारी फुटली. याबाबत परीक्षा केंद्राकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सध्या सुरू आहेत. सकाळच्या सत्रात व्यवस्थापन पदवी (बीएमएस) अभ्यासक्रमाची पाचव्या सत्राची ‘ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग’ या विषयाची परीक्षा होती.

सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू झाली. परीक्षेदरम्यान दुपारी पावणेबाराच्या सुमारास अंधेरी येथील ‘एमव्हीएम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स’ या महाविद्यालयांत एका विद्यार्थिनीकडे मोबाइल असल्याचे कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या लक्षात आले. या विद्यार्थिनीच्या मोबाइलमध्ये परीक्षा सुरू असलेलीच प्रश्नपत्रिका आढळून आली. याबाबतची माहिती महाविद्यालयाकडून विद्यापीठाला देण्यात आली. या प्रकरणी विद्यापीठाच्या सूचनेनुसार महाविद्यालयाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. मात्र पुनर्परीक्षेबाबत विद्यापीठाकडून काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाकडून कळवण्यात आले.

  • विद्यापीठाची प्रश्नपत्रिका संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांना पाठवण्यात येते. ज्या महाविद्यालयांत या प्रश्नपत्रिकेची छापील प्रत काढली जाते, त्या महाविद्यालयाचे नाव वॉटरमार्कच्या स्वरूपात प्रश्नपत्रिकेवर उमटते. त्यामुळे मोबाइलमध्ये मिळालेली प्रश्नपत्रिका कोणत्या महाविद्यालयात छापली होती त्याची माहिती सहज मिळू शकते, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2017 1:32 am

Web Title: mumbai university management degree course papers leaked
Next Stories
1 महाविद्यालयांत पायाभूत सुविधा नसतील तर शुल्कवाढ नाही!
2 ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर ताण वाढला
3 ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री
Just Now!
X