‘टीबायबीकॉम’नंतर आता मुंबई विद्यापीठाने ‘तृतीय वर्ष कला शाखे’च्या (टीवायबीए) ओळखपत्रांचा घोळ घातला असून परीक्षा तोंडावर आली असताना विद्यार्थ्यांना ओळखपत्रावरील चुकांच्या दुरुस्तीसाठी धावाधाव करावी लागते आहे.
या वर्षी विद्यापीठाने कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्ज ऑनलाइन भरून घेतले होते. विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षेची ओळखपत्रेही (हॉलतिकिटे) ऑनलाइनच मिळणार होती. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमधून त्याची प्रिन्टआऊट घ्यायची होती. पण, या ओळखपत्रांवर अनंत चुका आहेत.
‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या (एमकेसीएल) मदतीने विद्यापीठाने ही सर्व प्रक्रिया राबविली आहे. वास्तविक विद्यापीठाने ऑनलाइन अर्जाचा प्रयोग पहिल्या प्रथम एमकेसीएलच्या मदतीने विद्यापीठाच्या ‘दूरस्थ शिक्षण संस्थे’करिता (आयडॉल) राबविला होता. त्या वेळेसही आयडॉलच्या विद्यार्थ्यांना हाच मनस्ताप सहन करावा लागला होता. ‘गेल्या वर्षीचा अनुभव गाठीशी असताना पुन्हा एकदा एमकेसीएलला याच कामासाठी नेमण्याची चूक विद्यापीठाने केली आहे. आणि याचा मनस्ताप विनाकारण विद्यार्थ्यांना सोसावा लागतो आहे,’ अशी टीका सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केली. कला शाखेची परीक्षा ५ एप्रिलपासून सुरू होते आहे. परीक्षा तोंडावर असतानाच हा गोंधळ झाल्याने विद्यार्थी वैतागून गेले आहेत. कुणाच्या नावात तर कुणाच्या विषयात घोळ आहे. कुणाचे परीक्षा केंद्र चुकविले आहे तर कुणाचे पेपर कमी करून टाकले आहेत. ओळखपत्रांवर मोठय़ा प्रमाणावर चुका असल्याने विद्यापीठाने महाविद्यालय स्तरावरच चुकांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुधारित ओळखपत्र मिळावे यासाठी एमकेसीएलची वेबलिंक दिली. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रातील चुका या माध्यमातूनही दुरूस्त होत नसल्याने विद्यार्थ्यांना कलिना येथील परीक्षा विभागात धाव घ्यावी लागत आहे.
याच प्रकारचा अनुभव टीवायबीकॉमच्या परीक्षेदरम्यानही आला होता. परीक्षा दोन दिवसावर असताना विद्यार्थ्यांना चुकांच्या दुरुस्तीसाठी कलिना येथील परीक्षा विभागात खेटे घालावे लागत होते. आता टीवायबीएच्या ओळखपत्रांबाबतही तोच घोळ सुरू आहे. मुंबईतील १५ ते १६ महाविद्यालयांमध्ये ओळखपत्रांचा घोळ मोठय़ा प्रमाणावर आहे. ओळखपत्रांमध्ये चुका असल्याची बाब विद्यापीठाचे नियंत्रक दीपक वसावे यांनी मान्य केली.