मुदतीचा आज शेवटचा दिवस; ‘नॅककडे विनंती करण्याची शक्यता

मुंबई विद्यापीठाच्या ‘नॅक’ मूल्यांकनाचा आज, २० एप्रिलचा शेवटचा दिवस आहे. यामुळे तांत्रिकदृष्टय़ा शुक्रवारपासून विद्यापीठाचे सध्याचे ‘नॅक’ मूल्यांकन ग्राहय़ धरले जाणार नाही. मात्र हेच मूल्यांकन कायम राहण्यासाठी विद्यापीठ ‘नॅक’ला विनंती करणार आहे. मात्र अशी विनंती मान्य होत नसल्याचे ‘नॅक’च्या सूत्रांनी स्पष्ट केले.

मुंबई विद्यापीठाने ‘नॅक’ मूल्यांकनाची मुदत संपण्याआधीच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे अपेक्षित होते. पण ‘नॅक’ मूल्यांकनाच्या पद्धतीत बदल करत आहे. हे बदल झाल्यावरच अर्ज करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आणि अर्ज केला नसल्याचे स्पष्ट केले.

याचबरोबर जर विद्यापीठाने आता अर्ज केला असता तर नवीन पद्धत लागू झाल्यावर जुन्या पद्धतीने केलेल्या मूल्यांकनाला अर्थ उरला नसता असे मत विद्यापीठाच्या ‘अंतर्गत दर्जा मूल्यमापन समिती’ (आयक्यूएसी)चे प्रमुख प्रा. नीरज हातेकर यांनी व्यक्त केले. यामुळे आता विद्यापीठ ‘नॅक’ला विद्यापीठाचे सध्याचे मूल्यांकन नवी प्रक्रिया जाहीर होईपर्यंत कायम ठेवावे अशी विनंती करणारे पत्र पाठविणार असल्याचेही हातेकर यांनी नमूद केले. मात्र ‘नॅक’कडून अशी विनंती मान्य होत नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

याचबरोबर ज्या शैक्षणिक संस्थांनी ‘नॅक’कडे मूल्यांकनासाठी ३१ मार्चपूर्वी अर्ज केले आहेत त्यांचे मूल्यांकन जुन्या पद्धतीने होईल व त्यानंतरच्या अर्जाचे मूल्यांकन नवीन पद्धतीने केले जाणार आहे. यामुळे नवीन पद्धत आल्यावर जुन्या पद्धतीने झालेले मूल्यांकन बाद ठरणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मनविसेचा निषेध

विद्यापीठाने ‘नॅक’ मूल्यांकडे केलेले दुर्लक्ष अक्षम्य असून प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मनविसेने विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे, संतोष धोत्रे, परशुराम तपासे आणि मुंबई विद्यापीठ सरचिटणीस महेश ओवे यांच्या शिष्टमंडळाने कुलसचिवांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी त्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा शुल्क वाढीच्या निर्णयाचाही निषेध केला आहे. विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा वापर करत असताना शुल्क कपात करणे अपेक्षित आहे मात्र शुल्क वाढवत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा बोजा पडणार आहे. नवीन तंत्रज्ञानासाठी आवश्यक तो निधीराज्य शासनाकडून घ्यावा असे सूचित केल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले. याचबरोबर जर विद्यापीठाने ही शुल्कवाढ मागे नाही घेतली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनविसेने दिला आहे.