राज्यपालांनी कुलगुरूंना दिलेली मुदत आज संपुष्टात
वाणिज्य,विधी आणि कला शाखांसाठी आणखी तीन दिवस आवश्यक

‘कुठल्याही परिस्थितीत मुंबई विद्यापीठाचे रखडलेले सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत लावा’ असा सज्जड दम राज्यपाल व कुलगुरू सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना दिल्यानंतर विद्यापीठाने त्यासाठी नाना तऱ्हांनी आटापिटा केला असला तरी हे निकाल मुदत संपण्याच्या दिवशी, म्हणजे आज (सोमवारी) लागणे केवळ अशक्य आहे, असे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाच्या वाणिज्य, विधी व कला शाखांचे निकाल लागण्यासाठी आणखी दोन-तीन दिवस लागतील, अशी चिन्हे आहेत. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या अट्टहासामुळे ही वेळ प्रामुख्याने उद्भवली असून वेळेत निकाल जाहीर न झाल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशावर लाखो विद्यार्थ्यांना पाणी सोडावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.  दरम्यान, रविवारी दिवसभरात विद्यापीठाने १० निकाल जाहीर केले.

पदवी परीक्षांना ४५ दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर न करणाऱ्या विद्यापीठाची ४ जुलै रोजी राज्यपालांनी चांगलीच कानउघाडणी केली होती. विद्यापीठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यत जाहीर करा, असे आदेश त्यांनी कुलगुरूंना दिले होते. त्या आदेशानंतर खडबडून जाग्या झालेल्या विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाकडे मूल्यांकनाच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर २४ ते २७ जुलै या काळात अध्यापनाचे काम बंद करून ३ हजार ९८ प्राध्यापकांना पूर्णवेळ मूल्यांकनाच्या कामासाठी जुंपले. पण तरीही लाखो उत्तरपत्रिकांची तपासणी करणे शक्य झाले नाही. पूर्णवेळ मूल्यांकनाची मुदत पुढे वाढवून ३१ जुलैपर्यत करण्यात आली. इतके करूनही जवळपास तीन लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी राहिले. हे काम सोमवापर्यंत होणे अशक्यप्राय आहे, अशी कबुली विद्यापीठाकडूनच देण्यात आली आहे.

अद्याप तीन लाखाहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन होणे बाकी आहे. त्यामुळे वाणिज्य, विधी आणि कला शाखांचे निकाल जाहीर होण्यासाठी अजून दोन-तीन दिवसांचा कालावधी लागेल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि कला शाखेतील ५० विषयांचे निकाल सध्या अंतिम टप्प्यात आहेत, असे माजी कुलसचिव एम.ए.खान यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. विद्यापीठाच्या निकालासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित झाली असता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ लाख २९ हजार २९५ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी असल्याची माहिती २६ जुलै रोजी विधानसभेत दिली होती. या घटनेला रविवारी चार दिवस उलटले तरी विद्यापीठाच्या ३ लाखाहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी आहे. याचा अर्थ मागील दिवसांमध्ये पूर्णवेळ काम करुनही विद्यापीठाला सुमारे २ लाख उत्तरपत्रिकांचेच मूल्यांकन करण्यात यश आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या वेगाने आता या उर्वरित सुमारे तीन लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि पूर्णमूल्यांकनासाठी आठवडाभराचा वेळ लागणार असल्याचे प्राध्यापकांकडून सांगण्यात आले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचे निकाल शनिवारी रात्री उशीरा लावण्यात येतील असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यंत रखडलेल्यांपैकी केवळ दहा निकाल विद्यापीठाकडून जाहीर झाले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी संपलेली आहे. मात्र यातील १० ते १५ टक्के विद्यार्थ्यांचे अंतिम निकाल काही कारणास्तव तयार नसल्याने या विषयांचे निकाल सोमवारीही जाहीर होण्याची शक्यता नाही.

पूर्णवेळ मूल्यांकनाला रविवारची सुट्टी

गेला आठवडाभर पूर्णवेळ मूल्यांकनाच्या कामामुळे त्रस्त झालेल्या प्राध्यापकांनी रविवारी मूल्यांकनाच्या कामाला सुट्टी दिली! रविवारी मुंबईतील आणि मुंबईबाहेरील बहुतांश केंद्रावर मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या तुलनेने

कमी होती. त्यामुळे रविवारी मूल्यांकनाचे काम चांगलेच मंदावले होते.

याआधी काय घडले?

’परीक्षांच्या निकालांना विलंब झाल्याने राज्यपाल व मुंबई विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडून कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची झाडाझडती.

’निकाल ३१ जुलैपर्यंत लावण्याचे कुलपतींचे आदेश.

’निकाल वेळेत लावण्यासाठी विद्यापीठाची धावपळ. काही उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी नागपूर विद्यापीठाकडे. मुंबई विद्यापीठाची महाविद्यालये पूर्णवेळ मूल्यांकनासाठी आधी चार दिवस बंद. नंतर त्या मुदतीत वाढ. मूल्यांकनाच्या काळात सव्‍‌र्हरवर अतिरिक्त भार आल्याने अनेकदा त्यात अडचणी.