विद्यापीठाची पोचपावती कागदोपत्रीच; मानधन मिळवण्यासाठी हेलपाटे

संगणकाधारित मूल्यांकनाच्या कामामध्ये सहभागी न होणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यासाठी सज्ज असलेल्या मुंबई विद्यापीठाने मात्र मागील सत्रामध्ये मूल्यांकन केलेल्या प्राध्यापकांचेही मानधन पुढील सत्र परीक्षा सुरू झाल्या तरी रखडवून ठेवले आहे. एकीकडे मूल्यांकनाच्या कामामध्ये सहकार्य केल्याची पोचपावती विद्यापीठाकडून प्राध्यापकांना देण्यात आली असली तरी दुसरीकडे मात्र प्राध्यापकांना कामाचा मोबदला देताना विद्यापीठ काचकूच करत आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करत मूल्यांकन पार पाडलेल्या प्राध्यापकांवर आता मानधनाचे पैसे मिळविण्यासाठी विद्यापीठाचे हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे.

लांबलेल्या निकाल प्रक्रियेमुळे जूनपासून सुरू झालेली मूल्यांकन प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू होती. सदर प्रक्रियेमध्ये सुरुवातीच्या काळात असंख्य तांत्रिक अडचणी येत असूनही प्राध्यापकांनी मूल्यांकनाचे काम करून निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाला सहकार्य केले, असे जाहीर पत्रक विद्यापीठाने प्राध्यापक संघटनांना दिले आहे. ही जाहीर कबुली मात्र कागदोपत्री राहिली असून कामाचा मोबदला म्हणजे मूल्यांकनाचे मानधन पुढील सत्र परीक्षा सुरू झाल्या तरी अद्याप प्राध्यापकांना मिळालेले नाही. प्राध्यापकांच्या मूल्यांकनाचे सर्व तपशील विद्यापीठाकडे ऑनलाइन उपलब्ध असूनही मानधनासाठी का उशीर केला जात आहे, असा प्रश्न मुक्ता शिक्षक संघटनेने उपस्थित केला आहे. मागील सत्राच्या रखडलेल्या मूल्यांकनाला गती देण्यासाठी विद्यापीठाने मानधनाच्या रकमेत वाढ करण्याचे जाहीर केले. सुधारित मानधनानुसार प्राध्यापकांना मूल्यांकनाचे १२ रुपये, तर नियमनाचे(मॉडरेशन)चे २० रुपये देण्यात येणार आहे. विद्यापीठाने रकमेत वाढ केली असली तरी प्रत्यक्ष मानधन अजून बहुतांश प्राध्यापकांच्या हाती पडलेले नाही. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी असून पुढील सत्राच्या मूल्यांकनामध्ये सहकार्याची अपेक्षा विद्यापीठाने बाळगू नये, असा इशारा देणारे निवेदन मुक्ता शिक्षक संघटनेने विद्यापीठाला दिले आहे.

विद्यापीठाने मागील सत्राच्या मूल्यांकनामध्ये कारवाईची पत्रे पाठवली असूनही प्राध्यापकांनी अगदी सुट्टय़ांच्या काळामध्येही काम केले. यानंतरही प्राध्यापकांना आता स्वत:च्या कामाचा मोबदला मिळविण्यासाठी विद्यापीठामध्ये हेलपाटे घालावे लागत आहेत. विद्यापीठाकडे मानधनाचे अर्ज करून दोन महिने उलटले तरी अजून मानधन मिळाले नसल्याने प्राध्यापक संतप्त झाले आहेत. तेव्हा पुढील दोन आठवडय़ांत विद्यापीठाने सर्व प्राध्यापकांचे मानधन न दिल्यास आंदोलन करावे लागेल.  – प्रा. वैभव नरवड, मुक्ता शिक्षक संघटना