खोळंबलेल्या निकालांमुळे विद्यापीठावर नामुष्की

मुंबई : विद्यापीठाच्या विधि अभ्यासक्रमाचा परीक्षेचा तिढा अद्यापही कायम असून खोळंबलेल्या निकालांमुळे विधि अभ्यासक्रमाची परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर आली आहे. विद्यापीठाने साधारण आठ ते पंधरा दिवस परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र सातत्याने बदलणाऱ्या वेळापत्रकामुळे पुढील वर्षांचे वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालाचे विस्कटलेल्या वेळापत्रकाचे परिणाम अजूनही विद्यार्थी भोगत आहेत. या गोंधळात भर म्हणून विधि अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकांची तपासणी करण्यास प्राध्यापकच न मिळाल्यामुळे पुढील सत्र परीक्षा आणि निकालाची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची नामुष्की विद्यापीठावर आली आहे. तीन वर्षे आणि पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या बारा परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. विधिच्या परीक्षा २२ मेपासून सुरू होणार होत्या त्या आठ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आधीच्या सत्राचे निकाल जाहीर करण्यास झालेला उशीर आणि प्रलंबित निकालांमुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. एलएलबी दुसरे सत्र, सहावे सत्र, एलएलबी-बीएलएस सहाव्या आणि दहाव्या सत्राच्या परीक्षा २२ मेपासून सुरू होणार होत्या त्या आता ३० मेपासून सुरू होणार आहेत. द्वितीय वर्ष एलएलबी सत्र चौथे, एलएलबी-बीएलएस सत्र आठवे या परीक्षा २३ मेऐवजी ३१ मेपासून सुरू होणार आहेत. एलएलबी पहिले सत्र, पाचवे सत्र, तृतीय वर्ष एलएलबी-बीएलएस पाचवे सत्र, नववे सत्र यांच्या ७ जून रोजी सुरू होणाऱ्या परीक्षा २६ जूनपासून सुरू होणार आहेत. एलएलबी तिसऱ्या सत्राच्या आणि एलएलबी-बीएलएस सातव्या सत्राच्या परीक्षा ८ जूनऐवजी २६ जूनपासून सुरू होणार आहेत.

काही सत्रांचे निकाल जाहीर

विद्यापीठाने एलएलबीचा पहिल्या सत्राचा आणि एलएलबी, एलएलबी-बीएलएसच्या पाचव्या सत्राचे निकाल मंगळवारी जाहीर केले. पहिल्या सत्राची परीक्षा जानेवारीमध्ये झाली असून या परीक्षेला ६ हजार ६३५ विद्यार्थी बसले होते. त्यापैक १ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पाचव्या सत्राच्या परीक्षेला २ हजार ४८९ विद्यार्थी बसले असून त्यापैकी ३४.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.