नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हेलपाटे; मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ सुरूच

मुंबई विद्यापीठाच्या निकालामधील हजर-गैरहजेरीच्या गोंधळानंतर आता तांत्रिक चुकांमुळे शून्य गुणांचा गोंधळ सुरू झाला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या दूर व मुक्त अध्ययन शिक्षण संस्थेतील (आयडॉल) कला शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांच्या निकालामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याचे दिसत आहे. संगणकाधारित मूल्यांकनातील तांत्रिक गोंधळामुळे शून्य गुणांचा ठपका पडल्याने विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठामध्ये गर्दी केली होती. नोकरी करत शिक्षणही करणारे हे विद्यार्थी कामाला दांडी मारून हेलपाटे घालावे लागत असल्याने संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.

या विद्यार्थ्यांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना एक-दोन विषयांमध्ये शून्य गुण मिळाले आहेत. नवी मुंबईत राहणारी सानिका (नाव बदलले आहे) पत्रकार असून तिने समाजशास्त्र विषयामधून ही परीक्षा दिली होती. परंतु, एका विषयात शून्य गुण मिळाल्याचे पाहून तिला धक्काच बसला.

चौकशीसाठी बुधवारी विद्यापीठात आली असता तिला अनेक विद्यार्थी हीच तक्रार घेऊन आल्याचे आढळले. ‘तांत्रिक त्रुटीमुळे ज्या विषयाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झालेले नाही अशा विषयामध्ये शून्य गुण दिले गेले आहेत. प्रत्यक्षात त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत,’ असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले. याआधी जाहीर झालेल्या निकालामध्ये एखाद्या विषयाच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन बाकी असल्यास त्यांना हजर असूनही गैरहजरचा शेरा दिला गेला होता. तर आता उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण नसल्याने शून्य गुण दिसत आहेत.

तक्रार घेऊन आलेल्यांपैकी राधिका (नाव बदलले आहे) मतिमंदत्व आलेल्या विद्यार्थ्यांना शिकवितात. त्यांना चारपैकी एका विषयामध्ये २५ गुण मिळाले आहेत. ‘मी आत्तापर्यत नेहमीच प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे. अनुत्तीर्ण दाखविण्यात आलेला पेपर अत्यंत नीट सोडविला आहे. त्यामुळे या विषयामध्ये मी अनुत्तीर्ण होणे शक्यच नाही. परंतु विद्यापीठाने आता आम्हाला पुनर्मूल्यांकनाशिवाय दुसरा पर्याय ठेवलेला नाही,’ अशी तक्रार तिने केली. ‘नोकरी करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना निकालासाठी विद्यापीठामध्ये रोज खेटे घालणे शक्य नाही.

पुनर्मूल्यांकनाचे मूल्य कमी केले आहे, असे जरी विद्यापीठ सांगत असले तरी आमच्या वेळेची किंमत कोण भरून काढणार,’ असा प्रश्न तिने केला. दरम्यान, ‘गुरुवारपासून पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू होत असून विद्यार्थ्यांना त्याकरिता अर्ज करावे,’ असे आयडॉलचे जनसंपर्क अधिकारी विनोद मलाले यांनी स्पष्ट केले.

‘आयडॉल’चे प्रवेश सुरू

आयडॉलच्या पदवीच्या द्वितीय आणि तृतीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया रखडली होती. हे प्रवेश संस्थेने बुधवारपासून सुरू केले आहेत.

 

१९ सप्टेंबपर्यंत सगळे निकाल! न्यायालयात दावा; विद्यापीठाकडून नवी तारीख जाहीर

मुंबई : उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन मूल्यांकनामुळे आधीच विलंब झालेले निकाल जाहीर करण्याच्या मुदतवाढीचाही मुंबई विद्यापीठ बहुधा विक्रम करणार आहे. मूल्यांकनाचे काम ‘रोबोट’द्वारे नाही, तर माणसांद्वारे केले जाते, असे म्हणत निकाल जाहीर करण्याची नवी तारीख विद्यापीठाने बुधवारी उच्च न्यायालयाला सांगितली. त्यानुसार १९ सप्टेंबपर्यंत सगळे निकाल जाहीर करण्याचा दावा विद्यापीठाने केला असून त्यांच्या या दाव्याबाबत साशंक असलेल्या न्यायालयाने या तारखेपर्यंत निकाल जाहीर करावेच लागतील, असे विद्यापीठाला बजावत शेवटची संधीच दिली आहे.

निकाल जाहीर करण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले गेले. मात्र गणेशोत्सव आणि मंगळवारच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर तो जाहीर करण्यास विलंब झाल्याचा अजब दावा मुंबई विद्यापीठातर्फे गेल्या आठवडय़ात केला होता.

बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस गणेशोत्सव, बकरी ईद, अनंत चतुर्दशीच्या सुट्टय़ांसाठीही शिक्षकवर्ग सुट्टीवर होता. परिणामी, ६ सप्टेंबपर्यंत सगळे निकाल जाहीर करणे पुन्हा एकदा शक्य झाले नाही, असे पुन्हा एकदा विद्यापीठातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. मात्र १९ सप्टेंबपर्यंत उत्तरपत्रिका तपासण्याचे, निकाल जाहीर करण्याचे आणि गुणपत्रिका देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी हमी विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली. त्यावर अशा आणीबाणीच्या स्थितीत शिक्षकवर्ग उपलब्ध होऊ शकला नाही म्हणून निकाल जाहीर करण्यासाठी विलंब झाल्याची सबब विद्यापीठ देऊच कशी शकते, अशा शब्दांत न्यायमूर्ती अनुप मोहता आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने विद्यीपाठाच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले. परंतु उत्तरपत्रिका तपासण्याचे काम ‘रोबोट’ नव्हे, तर माणसे करत असल्याकडे विद्यापीठाच्या वतीने अ‍ॅड्. रूई रॉड्रिक्स यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच बहुतांशी प्रक्रिया पूर्ण होत आल्याचा दावा करत त्यानुसार १९ सप्टेंबपर्यंत सगळे निकाल जाहीर करण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. त्यावर उत्तरपत्रिका तपासण्याचे, निकाल जाहीर करण्याचे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, हे लेखी स्वरूपात लिहून देण्याचे न्यायालयाने विद्यापीठाला बजावले आहे.

’ पदवीसाठीच्या विविध अभ्यासक्रमांच्या ४७७ परीक्षा घेण्यात आल्या. त्यातील ४६४ परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर करण्यात आल्याचा दावाही विद्यापीठाने केला. तर वाणिज्य तसेच अकाऊंट्स आणि अर्थ विषयाचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. परंतु बँकिंग आणि विमा विषयाच्या ५ हजार ९३२ विद्यार्थ्यांचे निकाल बुधवार सायंकाळपर्यंत, तर वाणिज्य तसेच अकाऊंट्स आणि अर्थ विषयाच्या ८ हजार १३२ विद्यार्थ्यांचे निकाल १३ सप्टेंबपर्यंत जाहीर करण्यात येऊन या सगळ्या विद्यार्थ्यांना १९ सप्टेंबपर्यंत गुणपत्रिका देण्यात येतील. त्यात मुंबईच्या विद्यार्थ्यांना निकालानंतर दोन दिवसांनी, तर मुंबईबाहेरील विद्यार्थ्यांना १९ सप्टेंबपर्यंत गुणपत्रिका मिळतील. तसेच त्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी अर्ज करावा लागेल, असेही विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.