विद्यापीठाला नव्या विधि महाविद्यालयांचा सोस

रसिका मुळ्ये, मुंबई</strong>

विद्यापीठाच्या अधिकार मंडळांची परवानगी न घेताच मुंबई विद्यापीठाने पुढील शैक्षणिक वर्षांच्या बृहत आराखडय़ानुसार नव्या महाविद्यालयांसाठी प्रस्ताव घेण्याची तयारी केली आहे. दरम्यान मुळातच मुंबईत अनेक विधि महाविद्यालये असताना नव्याने विधि महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

मुंबई विद्यापीठाने पुढील शैक्षणिक वर्षांसाठी (२०२०-२१) बृहत आराखडा तयार केला आहे. त्यानुसार नव्याने १९ महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन विद्यापिठाने केले आहे. मात्र, व्यवस्थापन परिषदेची मंजुरी न घेताच विद्यापीठाने आराखडा शासनाकडे पाठवला आहे. कायद्यानुसार विद्यापीठाने अधिकार मंडळांची मंजुरी घेऊन आराखडा पाठवणे आवश्यक आहे. विद्यापीठाला मात्र या नियमाचा विसर पडला आहे.

‘अधिकार मंडळांमध्ये कोणतीही चर्चा न होता बृहत आराखडा विद्यापीठावर लादण्यात आला आहे. एखाद्या भागातील गरजा काय, तेथील परिस्थिती काय याबाबत सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य यांना अधिक माहिती असते. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत बृहत आराखडय़ावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक असते. परस्पर बृहत आराखडा मान्य केल्याबाबत कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर आणि शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी चर्चा करणार आहे, असे युवासेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

नव्या विधि महाविद्यालयांचा सोस

मुंबई विद्यापीठाने यंदा सहा नवी विधि महाविद्यालये सुरू केली होती. आता पुढील वर्षी पुन्हा एकदा मुंबई शहरात चार नवी महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन आहे. विलेपार्ले, जुहू, डोंबिवली आणि कल्याण येथे नवी विधि महाविद्यालये सुरू करण्याचे बृहत आराखडय़ात नमूद करण्यात आले आहे. गेल्यावर्षी नव्याने विधि महाविद्यालये सुरू करण्यास व्यवस्थापन परिषद सदस्यांनी विरोध केला होता. मात्र यंदा चर्चा टाळून ही महाविद्यालये सुरू करण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. दरम्यान बार काऊन्सिल ऑफ इंडियाने पुढील वर्षांपासून तीन वर्षे नवी विधि महाविद्यालये सुरू करण्यास बंदी घातलेली असतानाही बृहत आराखडय़ात विधी महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.

कौशल्य विकास महाविद्यालय

भांडूप येथे एक कौशल्य विकास महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दादर, अंधेरी आणि भांडूप येथे रात्र महाविद्यालय सुरू होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पाच, रत्नागिरी, रायगड येथे एक आणि पालघर येथे दोन पारंपरिक अभ्यासक्रमाची महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महाड आणि दापोली येथी महिला महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.