News Flash

विद्यापीठाच्या दैनंदिन कामावर परिणाम?

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांचा राजीनामा न घेता त्यांना पदावरून दूर राहण्याचे आदेश देऊन राज्यपालांनी विद्यापीठाची अवस्था विचित्र करून टाकली असून याचा मोठा परिणाम

| February 21, 2015 04:26 am

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांचा राजीनामा न घेता त्यांना पदावरून दूर राहण्याचे आदेश देऊन राज्यपालांनी विद्यापीठाची अवस्था विचित्र करून टाकली असून याचा मोठा परिणाम विद्यापीठाच्या दैनंदिन प्रशासकीय कारभारावर होणार आहे.
आतापर्यंत एखादा वाद उद्भवल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एकतर स्वत:हून तरी राजीनामा दिला आहे किंवा त्यांना राज्यपालांनीच राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. परंतु, न्यायालयाने वारंवार पात्रता निकषांबाबत नकारात्मक टिपण्णी करूनही वेळूकर आपल्या पदाला चिकटून होते. परिणामी राज्यपालांनीच त्यांना कुलगुरूपदापासून दूर राहण्याचे आदेश दिले. मात्र, कुलगुरूंवर या प्रकारची कारवाई आतापर्यंत कधीच केली गेली नव्हती. कारण, कुलगुरू राजीनामा देऊन आपल्या पदावरून पायउतार झाल्यानंतर प्र-कुलगुरू आणि बीसीयूडी संचालकांनाही आपले पद सोडावे लागते. अशा परिस्थितीत जवळच्या विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरूपदांचा कार्यभार सहा महिन्यांकरिता सोपविला जातो. परंतु, वेळूकर यांचे कुलगुरूपदाचे अधिकार प्र-कुलगुरूंना देऊन राज्यपालांनी परिस्थिती गुंतागुंतीची करून ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. संबंधित प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असल्याने राज्यपालांनी हा निर्णय घेतल्याचे राजभवनातील सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु, या विचित्र परिस्थितीचा मोठा परिणाम विद्यापीठाच्या दैनंदिन कारभारावर होणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या सोडविणाऱ्या विद्यापीठांच्या ‘तक्रार निवारण समिती’च्या कामावर याचा मोठाच परिणाम होण्याची शक्यता आहे.

*प्र-कुलगुरू या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या समित्यांनी घेतलेले निर्णय विद्यापीठाची कार्यकारी यंत्रणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यवस्थापन समितीकडे शिक्कामोर्तब करण्यासाठी येतात. या समितीचे अध्यक्ष कुलगुरू असतात. परंतु, आता प्र-कुलगुरू म्हणून समितीच्या अध्यक्षपदी राहून घेतलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा तीच व्यक्ती व्यवस्थापन समितीची अध्यक्ष म्हणून कशी काय शिक्कामोर्तब करणार, असा प्रश्न एका माजी सिनेट सदस्याने व्यक्त केला.
*‘मुळात वेळूकर यांनी न्या. गिरीश गोडबोले यांनी निकाल देताना त्यांच्या पात्रता निकषांसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नानंतरच आपल्या पदावरून सन्मानपूर्वक पायउतार व्हायला हवे होते. परंतु, वेळूकर आपल्या पदाला चिकटून होते. एका मागोमाग एक न्यायालयाचे ताशेरे ऐकून घ्यावे लागल्यानंतरही त्यांचा पदाचा सोस सुटला नव्हता. यामुळेच दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या विद्यापीठावर ही वेळ आली आहे,’ अशी प्रतिक्रिया एका शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली.
*कुलगुरूपदांची तात्पुरती जबाबदारी वाहाव्या लागलेल्या प्र-कुलगुरू नरेशचंद्र यांनी विद्यापीठाचे उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिवांची बैठक शुक्रवारी दुपारी बोलावून धडाक्यात कामाला सुरुवात केली. विद्यापीठाचा कारभार सुधारण्याकरिता काय करता येईल, याची चर्चा या बैठकीत झाली. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तड लावण्यासाठी यापुढे प्रत्येक विभागात सूचना पेटी लावण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 4:26 am

Web Title: mumbai university rajan welukar
टॅग : Rajan Welukar
Next Stories
1 समीर भुजबळ यांची साडेतीन तास चौकशी
2 महापालिका म्हणते, स्वाईन फ्लू नियंत्रणात
3 मालमत्ता करातील २० टक्के वाढीचा डाव भाजपने उधळला
Just Now!
X