मुंबई विद्यापीठात एमएससीची नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कावर विलंब शुल्काची वसुली केली जात आहे.
विद्यापीठाने एमएससीच्या प्रवेशाची मुदत वाढविली आहे. त्यानुसार विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी जात आहेत. प्रवेश घेत असतानाच विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्जही भरून घेतला जात आहे. यासोबत परीक्षा शुल्क आकारले जात आहे. पण परीक्षा विभाग आणि प्रवेश प्रक्रिया विभागात समन्वय नसल्यामुळे महाविद्यालयांकडे परीक्षा विभागाचे जुनेच परिपत्रक आहे. या परिपत्रकानुसार २० ते ३० ऑगस्टदरम्यान प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कावर १०० रुपये विलंब शुल्क वसूल करण्यात आले. तर त्यानंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये वसूल केले जात आहे. याबाबत अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी विद्यापीठाला विचारणा करून हा प्रकार तातडीने थांबविण्याचे सांगितले. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क वसूल करण्यात आले आहे ते परत करावे असेही सांगितले आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क वसूल करण्यात आले आहे ते त्यांना परत दिले जाईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी स्पष्ट केले.