मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांचे राज्यपालांना उत्तर

उत्तरपत्रिकांचे गठ्ठे हाताळताना आणि पुढे ते ‘स्कॅनिंग’साठी देताना ‘घातपात’ करून उत्तरपत्रिकांची मुद्दामहून सरमिसळ करण्यात आल्याने ऑनलाइन मूल्यांकनाच्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त विलंब झाला, असा गंभीर मुद्दा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी राज्यपालांच्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देताना मांडला आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांनाही निकालांना झालेल्या विलंबासाठी जबाबदार ठरविले जावे, अशी अपेक्षा त्यांनी आपली बाजू मांडताना राज्यपालांकडे व्यक्त केल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एप्रिल, २०१७ मध्ये झालेल्या सर्वच म्हणजे ४७७ परीक्षांचे संगणकाधारित (ऑनलाइन) मूल्यांकन करण्याच्या निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले संजय देशमुख सध्या राजभवनवरून मिळालेल्या आदेशांमुळे ८ ऑगस्टपासून रजेवर आहेत. तत्पूर्वी विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला अपयश आल्याने राजभवनने कुलगुरूंना १ ऑगस्टला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. या वेळी पुढील १५ दिवसांत कुलगुरूंना निकालांना झालेल्या विलंबाचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश राज्यपालांनी दिले होते. मात्र त्यानंतर आठच दिवसांत रजेवर जावे लागल्याने या नोटिशीला कुलगुरूंनी तात्पुरते (अंतरिम) उत्तर दिल्याची माहिती राजभवनमधील सूत्रांनी दिली.

ऑनलाइन मूल्यांकनामुळे विद्यापीठाचे निकाल यंदा चांगलेच रखडले आहेत. निविदा प्रक्रिया लांबल्याने आणि नंतरच्या काळात शिक्षक रजेवर गेल्याने ऑनलाइन मूल्यांकनाचे काम अपेक्षेपेक्षा उशिराने सुरू झाले. त्यावर ‘मूल्यांकनाकरिता आवश्यक व अत्याधुनिक अशी यंत्रणा पुरवून या कामाला गती देण्याची आणि निकाल वेळेत लावण्याची योजना आपण आखली होती; परंतु मधल्या काळात सुमारे सव्वा लाख उत्तरपत्रिकांची हाताळणी चुकीच्या पद्धतीने झाल्याने वेगवेगळ्या विषयांच्या उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाली. तो ‘घातपात’ होता. हाच प्रकार पुढे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करतानाही कायम राहिला आणि प्राध्यापकांकडे चुकीच्या विषयाच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाकरिता गेल्या. या गोंधळामुळे मूल्यांकनाचे काम लांबले आणि निकालही दिलेल्या मुदतीत जाहीर होऊ शकले नाहीत,’ अशा अर्थाचा खुलासा संजय देशमुख यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात केल्याची माहिती राजभवनमधील सूत्रांनी दिली.

  • मूल्यांकनाच्या कामात पारदर्शकता यावी आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार बंद होऊन हुशार विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठीच सर्व विषयांच्या ऑनलाइन मूल्यांकनाचा निर्णय आपण घेतला होता. त्यामुळे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे हाताळताना जो प्रकार झाला त्याच्या मुळात जाण्याची गरज कुलगुरूंनी आपल्या तात्पुरत्या खुलाशात व्यक्त केली आहे.
  • आपला हा मुद्दा आपण आकडेवारीच्या आधारे सप्रमाण सिद्ध करू शकतो. मात्र सध्या रजेवर असल्याने ही माहिती मला आता उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी आपली बाजू मांडण्याकरिता आपल्याला आणखी काही दिवसांचा अवधी मिळावा, अशी अपेक्षाही कुलगुरूंनी व्यक्त केल्याचे समजते. याबाबत संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.