उत्तरपत्रिका तपासणीला ‘नियमानुसार काम’ आंदोलनाचा फटका

दरवर्षी निकालाचा खेळखंडोबा करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या निकालांना यंदा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ‘नियमानुसार काम’ या आंदोलनाचा फटका बसणार आहे. एरवी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणी केंद्राचे (कॅप) काम सुरू असते. परंतु, आता १० ते ५ याच वेळेत काम करण्याची भूमिका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतल्याने अनेक प्राध्यापकांसमोर दिलेल्या वेळेत उत्तरपत्रिका तपासणी कशी पूर्ण होणार असा प्रश्न उभा ठाकला आहे. या सगळ्यात विद्यापीठाचे निकाल यंदा पुन्हा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसमोर वेळेवर वेतन न मिळणे, जास्तवेळ काम करण्यासाठी मोबदला न मिळणे आदी अनेक अडचणी आहेत. त्या विरोधात कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात ‘नियमानुसार काम’ हे धोरण अवलंबिले आहे. विद्यापीठाच्या कालिना संकुलातील उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावरही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. यामुळे दरवेळेस सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत सुरू असेलेले ‘कॅप’ केंद्र यंदा मात्र १० ते ५ या वेळेतच सुरू ठेवले जात आहे. याचा फटका गेल्या आठ दिवसांपासून उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला बसतो आहे. सवयीप्रमाणे प्राध्यापक सकाळी कालिनाला पोहोचतात. मात्र, येथील कर्मचारी १० वाजल्याशिवाय केंद्राचे दार उघडत नाहीत. तसेच बरोबर पाच वाजता केंद्र बंद करण्यासाठी सर्व प्राध्यापकांना बाहेर जाण्यास सांगितले जाते, अशी तक्रार उत्तरपत्रिका तपासणीसाठी आलेल्या एका प्राध्यापकाने केली.

सध्या महाविद्यालयांमध्ये विविध परीक्षा सुरू असून तेथेही अनेक कामे आहेत. ही कामे सांभाळून अनेक प्राध्यापक सकाळी लवकर येऊन दुपापर्यंत उत्तरपत्रिका तपासतात किंवा काही प्राध्यापक सकाळी महाविद्यालयाचे काम संपवून दुपारी विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणीसाठी येतात. मात्र हे केंद्र केवळ १० ते ५ याच वेळेत सुरू ठेवल्यामुळे या प्राध्यापकांना त्यांच्या वेळेनुसार काम करणे अवघड जात आहे, असे प्राध्यापकांनी नमूद केले.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय्य असल्याने विद्यापीठाने त्यावर तोडगा काढून केंद्राच्या वेळा पूर्ववत कराव्यात असेही प्राध्यापकांनी सुचविले. दरम्यान, या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याचे मान्य करण्यात आले आहे. यामुळे ‘कॅप’चे काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी स्पष्ट केले.