निकाल लांबल्याने विद्यापीठाचे नियोजन कोलमडले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाइन मूल्यांकनामुळे मुंबई विद्यापीठाचे निकाल लांबल्याने सत्र परीक्षांचे नियोजनही कोलमडले आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या सत्र परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार असल्याने या सर्व परीक्षांच्या मूल्यांकनाच्या कामाचा ताण एकाच वेळी अध्यापकांवर येणार आहे. यामुळे विद्यापीठाच्या निकाल विलंबाची पुनरावृत्ती पुढील वर्षीही होणार असल्याचे संकेत आहेत.

विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ३० ऑक्टोबरपासून प्रथम वर्षांच्या सत्र परीक्षा सुरू होणार होत्या. परंतु, प्रथम वर्षांचे वर्ग उशिरा सुरू झाल्याने आणि अध्यापनासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने या सत्राच्या परीक्षा पुढे ढकलाव्या, अशी मागणी ‘बुक्टू’ संघटनेने केली होती. त्यानुसार प्रथम वर्षांच्या सत्र परीक्षा २० नोव्हेंबरपासून घेण्याचे विद्यापीठाने जाहीर केले.

द्वितीय वर्षांच्या सत्र परीक्षांच्या नियोजनातही घोळ घालण्यात आला आहे. महाविद्यालयांत द्वितीय वर्षांचे वर्ग ५ जूनपासून सुरू झाले. या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण झाला आहे. त्यामुळे द्वितीय वर्षांच्या सत्र परीक्षा दिवाळीच्या सुट्टीआधी घेणे अपेक्षित होते. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करता आले असते. आता नोव्हेंबरपासून तिन्ही वर्षांच्या सत्र परीक्षा सुरू होणार असल्याने पूर्ण महिना परीक्षा घेण्यातच जाणार आहे. तसेच डिसेंबर महिनाही मूल्यांकनात जाणार आहे. याचा पुढच्या वर्षांच्या सत्राच्या अभ्यासक्रमावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या परीक्षाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे, असे डहाणूकर महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सांगितले. पुढील सत्रांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करणे अवघड होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या परीक्षा व निकाल लांबण्याची शक्यता आहे, असे मत साठय़े महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी व्यक्त केले.

‘सीए’च्या ‘इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पेटन्स’ अभ्यासक्रमाची परीक्षा २ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. वाणिज्य शाखेतील दुसऱ्या वर्षांतील बहुतांश विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दुसऱ्या वर्षांची सत्र परीक्षा ९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या वर्षांची परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असे झुणझुणवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सांगितले आहे.  याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकला नाही.

चुकांची पुनरावृत्ती टाळण्याची मागणी

ऑनलाइन मूल्यांकनाचे काम पुन्हा मेरिट ट्रॅक कंपनीलाच दिल्याने या सत्राच्या मूल्यांकनामध्येही अडचणी निर्माण होऊन निकालांना विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूल्यांकनात चुकांची पुनरावृत्ती टाळावी, अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच ४७७ परीक्षांचे निकाल जाहीर केले असले तरी अद्याप ११,००० विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने राखून ठेवले आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

  • पहिल्या वर्षांचे वर्ग जुलैपासून सुरू, तर परीक्षा २० नोव्हेंबरपासून
  • दुसऱ्या वर्षांचे वर्ग जूनपासून सुरू, तर परीक्षा ९ नोव्हेंबरपासून
  • तिसऱ्या वर्षांचे वर्ग जूनपासून सुरू, तर परीक्षा २० नोव्हेंबरपासून
  • पहिल्या सत्राचा कालावधी – ५ जून ते १६ ऑक्टोबर’१७
  • दुसऱ्या सत्राचा कालावधी – ९ नोव्हेंबर २०१७ ते ३० एप्रिल २०१८
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university session examination jumble
First published on: 05-10-2017 at 01:32 IST