02 March 2021

News Flash

विद्यापीठाचे ऑनलाइन तक्रार निवारण संकेतस्थळ

विद्यासागर राव यांनी निकाल रखडपट्टीवरून विद्यापीठाची चांगलीच खरडपट्टी काढली.

मुंबई विद्यापीठ

हेलपाटे घालून हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा

ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या घोळामुळे निर्माण झालेल्या प्रदीर्घ निकाल रखडपट्टीनंतर जाहीर झालेल्या निकालांमध्ये असणाऱ्या असंख्य त्रुटींचे निरसन करण्यासाठी मुंबई विद्यापीठातील मदतकेंद्र अपुरे पडत असल्याने आता ऑनलाइन तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे. निकालाबाबतच्या तक्रारींचा पाढा घेऊन दररोज विद्यापीठाचे हेलपाटे घालणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्रामुळे तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश अर्ज करण्यासाठीची मुदत विद्यापीठाने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली होती. परंतु ४७७ परीक्षांच्या निकालांपैकी अद्याप १७ निकाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ही मुदत ८ सप्टेंबर वाढविण्यात आली आहे.

राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती चे. विद्यासागर राव यांनी निकाल रखडपट्टीवरून विद्यापीठाची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर विद्यापीठाने ३१ जुलैपासून निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली. घाईगडबडीने घेतलेल्या ऑनस्क्रीन मूल्यांकनच्या निर्णयाचे पडसाद जाहीर झालेल्या निकालासोबतच दिसू लागले. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण न झाल्यामुळे निकाल राखीव ठेवणे, राखीव निकालामध्ये विद्यार्थी हजर असूनही गैरहजर असल्याचे दिसणे, हुशार विद्यार्थ्यांना काही विषयांमध्ये चार किंवा सहा गुण मिळणे, विद्यार्थी उत्तीर्ण असूनही अनुत्तीर्ण दाखविणे अशा असंख्य तक्रारी घेऊन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली. तेव्हा या तक्रारींचे रीतसर निवारण करण्यासाठी विद्यापीठाने मदतकेंद्र सुरू केले. परंतु या मदतकेंद्रावर असलेले अधिकारी आणि परीक्षा भवनामधील कारभार यांचा ताळमेळच नसल्याने सकाळी आलेले विद्यार्थी परीक्षा भवनाच्या इमारतीमध्ये दिवसभर फिरून शेवटी रिकाम्या हातानीच माघारी जात आहेत. विद्यार्थी हजर असूनही निकालपत्रामध्ये गैरहजर दिसणे हा तांत्रिक चुकीमुळे झालेला घोळ आहे, अशी कबुली परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांनी दिली असली तरी परीक्षा भवनातील काही कर्मचाऱ्यांना अद्याप याबाबत काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे गैरहजेरीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांला हजेरीचे पुरावे आणण्यास सांगितले जाते. विद्यार्थ्यांना मात्र या नियोजनातील अभावामुळे विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

‘ऑनलाइन केंद्राच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी १० अधिकाऱ्यांचा चमू कार्यरत असणार आहे. आलेल्या तक्रारींचा तात्काळ मागोवा घेऊन त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर आणि ईमेलवर प्रत्युत्तर दिले जाणार आहे,’ असे घोटाळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. वाणिज्य शाखेच्या ५००हून अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे आत्तापर्यंत निवारण करण्यात आले आहे, तर तांत्रिक अडचणीमुळे ० ते १४ असे गुण मिळालेल्या विधि शाखेतील ९६७ विद्यार्थ्यांच्या निकालातील त्रुटी दूर करून योग्य निकाल जाहीर करण्यात आले आहेत, असेही पुढे ते म्हणाले.

ऑनलाइन केंद्राच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी १० अधिकाऱ्यांचा चमू कार्यरत असणार आहे. आलेल्या तक्रारींचा तात्काळ मागोवा घेऊन त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर आणि ईमेलवर प्रत्युत्तर दिले जाणार आहे,’

-अर्जुन घाटुळे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

शंकांचे निरसन असे करा

नियोजनातील अभावामुळे विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची दखल घेत, विद्यापीठाने आता ऑनलाइन तक्रार निवारण करण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे. निकालाबाबत शंका किंवा तक्रारी  https://www.asia-sp.in/MU/results.php या संकेतस्थळावर नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शाखानिहाय अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि विधि व व्यवस्थापन असे पाच विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी त्याचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, परीक्षेबाबतची माहिती, महाविद्यालयाचा सांकेतांक क्रमांक देणे गरजेचे आहे. तसेच यासोबतच निकालाबाबतीत तक्रार नोंदवून परीक्षा प्रवेशपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 4:23 am

Web Title: mumbai university sets up grievance redressal portal for students
Next Stories
1 मध्य रेल्वेला ४० कोटी रुपयांचा फटका
2 खडसेंवरील आरोपांची काय चौकशी केली?
3 ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळणे अनिवार्यच!
Just Now!
X