अंतिम वर्षांच्या परीक्षांच्या तोंडावर सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.

राज्यातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत तर पुनर्परीक्षार्थीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. मात्र, आता या परीक्षांच्या तोंडावर विद्यापीठ कर्मचारी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.

मात्र, त्यानंतरही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त समितीने घेतला आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ कार्योत्तर मान्यता घेऊन पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करावे, अशा संघटनेच्या मागण्या आहेत.