६० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचा लसीकरणात सहभाग

मुंबई : करोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाचा लाभ मुंबई विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही घेतला आहे. मंगळवारपासून बीकेसी येथील केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. चार दिवसांत सुमारे १२०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतले.

सध्या प्रत्यक्ष कामकाज सुरू असलेल्या शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचेही लसीकरण व्हायला हवे, असा प्रस्ताव मुंबई विद्यापीठ शिक्षक, अधिकारी व कर्मचारी समितीने बीकेसी लसीकरण केंद्राच्या अधिष्ठात्यांना दिला होता. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे यासाठी समितीने विद्यापीठातील इतर संस्था आणि शिक्षकांनाही आवाहन केले होते.

समितीच्या प्रस्तावाला मान्यता देत २३ ते २६ जानेवारी या कालावधीत बीकेसी येथे लसीकरण प्रक्रिया पार पडली. विद्यापीठात स्थायी- अस्थायी मिळून १८०० कर्मचारी, तर २०० हून अधिक शिक्षक, असा अंदाजे २ हजार कर्मचारीवर्ग आहे. त्यापैकी १२०० लोकांचे लसीकरण या चार दिवसांत झाले. कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद आल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी आणखी दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्चअखेरीस ३० आणि ३१ तारखेला हे लसीकरण होईल. त्यासाठीही जवळपास ५०० हून अधिक कर्मचारी इच्छुक असल्याची माहिती समन्वय समितीने दिली आहे.

गेले काही दिवस विद्यापीठातही बरेच कर्मचारी करोनाबाधित होत आहेत. म्हणूनच शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका दिवसात २०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल, असा अंदाज समितीने दिला होता;

परंतु चार दिवसांत १२०० कर्मचारी लसीकरण प्रक्रियेत सहभागी झाले. अंदाजे ६० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे पुढील टप्प्यात होईल.

– रुपेश मालुसरे, समन्वयक मुंबई विद्यापीठ शिक्षक, अधिकारी व कर्मचारी समन्वय समिती