विद्यापीठ विभागांच्या परीक्षांची प्रणाली आयफोनवर नाही; महाविद्यालयांमध्ये सर्रास प्रश्नसंचाचे वाटप

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्षांच्या परीक्षांचे नियोजन सुरू केले असून परीक्षा तोंडावर असताना त्यातील गोंधळ समोर येऊ लागले आहेत. विद्यापीठ विभागांतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने निवडलेली प्रणाली अनेक संगणक आणि मोबाइल प्रणालींसाठी समर्पक नसल्याची तक्रार विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केली आहे.

मुंबई विद्यापीठाची अंतिम वर्षांच्या परीक्षांची तयारी सुरू असून परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या (बॅकलॉग) विद्यार्थ्यांची परीक्षा  शुक्रवारपासून सुरू होत आहे, तर नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. विद्यापीठ विभागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन विद्यापीठ करणार आहे तर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांची जबाबदारी विद्यापीठाने महाविद्यालयांचे समूह करून त्यांच्यावर सोपवली आहे. सध्या या परीक्षांच्या नियोजनातील गोंधळ समोर आला आहे.

विद्यापीठाला आयफोनचे वावडे

विद्यापीठाने त्यांचे विभाग आणि दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) बहुपर्यायी परीक्षेसाठी अ‍ॅप घेतले आहे. मात्र, ते अ‍ॅप अँड्रॉइड आणि विंडोज प्रणालीच्या काही आवृत्त्यांवरच घेता येत असल्याचे समोर आले आहे. आयफोनसाठी वापरण्यात येणारी ‘मॅक’ किंवा ‘मॅक ओएस’ या प्रणालींवर हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करता येत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्याचबरोबर विंडोजच्या ८ किंवा १० या आवृत्तीसाठीही विद्यापीठाची प्रणाली समर्पक नाही. त्यामुळे आयफोन, आयपॅड, मॅकबुक किंवा तत्सम प्रणाली वापरणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

महाविद्यालयांकडून सर्रास प्रश्नसंचांचे वाटप

विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नांचे स्वरूप कळण्यासाठी नमुना द्यावा, अशा स्पष्ट सूचना विद्यापीठाने दिलेल्या असतानाही अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांना सर्रास प्रश्नसंच देत आहेत. मुळातच लेखनकौशल्यावर आधारित अनेक विषयांची परीक्षा सध्या बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात घेण्याची वेळ प्राध्यापकांवर आली आहे. त्यातच विद्यार्थ्यांना आधीच सर्व प्रश्न कळल्यास परीक्षेचे गांभीर्य कसे राहणार, असा प्रश्न प्राध्यापकांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आधी प्रश्नसंच देण्यात आल्यामुळे इतर विद्यार्थ्यांवर तो अन्याय असल्याचेही प्राध्यापकांचे म्हणणे आहे. काही महाविद्यालयांनी फक्त २५ प्रश्नांचा संच तयार करून तीच प्रश्नपत्रिका म्हणून द्यायचे ठरवले आहे. काही महाविद्यालयांनी १५० प्रश्नांचा संच तयार केला आहे.