पुढील सत्र परीक्षांचे वेळापत्रक मात्र जाहीर

ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या गोंधळामुळे लांबलेले सर्व विद्यार्थ्यांचे निकाल आठवडाभरात जाहीर करण्याचे मुंबई विद्यापीठाचे आश्वासन फोल ठरले आहे. विधी शाखेच्या काही विद्यार्थ्यांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत. त्यात विद्यापीठाने विधीच्या पुढील सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून परीक्षा अर्ज भरण्यासाठी २४ ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. एकीकडे पुढील सत्र परीक्षा तोंडावर आल्या आहेत आणि दुसरीकडे आधीच्या सत्राचे निकाल हातात नाहीत या दुहेरी कोंडीत विद्यार्थी सापडले आहेत. विद्यापीठाच्या निकाल विलंबामुळे पुढील शैक्षणिक वर्ष वाया जाणार का, अशी चिंता या विद्यार्थ्यांना लागली आहे.

विद्यापीठाने उत्तरपत्रिका गहाळ झालेल्या २३०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन त्यांच्या निकालाचा प्रश्न निकालात काढला असला तरी राखीव निकाल ठेवलेल्या अजून सुमारे १०० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत.

विद्यापीठाने दिलेली आठवडाभराची मुदत उलटून गेली तरी आमचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यात विद्यापीठाने पुढच्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्याने आमची हूरहूर अजूनच वाढली आहे. माझी पुढच्या म्हणजेच तिसऱ्या सत्राची परीक्षा १२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अर्ज भरण्याची तारीखही आता पुढच्या तीन दिवसांत संपेल. आमच्या बरोबरीचे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत. आम्ही मात्र मागच्या सत्राच्या निकालासाठी घुटमळत बसलो आहोत, असे ठाण्याच्या व्ही.पी.एम. विधी महाविद्यालयाच्या दुसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांने सांगितले आहे.

माझा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेला असून मी एका विषयामध्ये नापास असल्याचे दाखवत आहे. मला त्यापैकी एक पेपरच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे. परंतु आता पुढच्या सत्राची परीक्षा डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तेव्हा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज, त्याचा निकाल या चक्रात अडकायचे की परीक्षेची तयारी करायची? इतक्या कमी वेळात सत्राचा अभ्यास पूर्ण करणे कठीण आहे. तेव्हा विद्यापीठाने या सत्र परीक्षा पुढे ढकलाव्यात, असे आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या चौथ्या सत्राच्या विद्यार्थ्यांने व्यक्त केले आहे.

* विधी शाखेच्या अमेय मालशे याने निकाल विलंबाविरोधात केलेल्या उपोषणानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक अर्जुन घाटुळे यांनी पुढील आठवडाभरात राखीव निकाल जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या घटनेलाही आता दहा दिवस उलटले तरी सर्व विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. यामध्ये विधी शाखेचे निकाल रखडलेले आहेत. त्यात पुढील सत्राच्या परीक्षाचे वेळापत्रकही विद्यापीठाने जाहीर केले आहे.

* या परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना १७ ते २४ ऑक्टोबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु आधीच्या सत्राचे निकालच जाहीर झाले नसल्याने पुढील सत्र परीक्षांचे अर्ज कसे भरायचे, असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.

विद्यार्थ्यांचे निकालच अद्याप जाहीर झालेले नसताना विद्यापीठाने पुढील सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणे या विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यासारखे आहे. त्यात अर्ज भरण्याची मुदत २४ ऑक्टोबपर्यंत देण्यात आली असून त्यानंतर अर्ज करणाऱ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. परीक्षांच्या निकालाला प्रदीर्घ विलंब करणारे विद्यापीठ विलंब शुल्क भरणार का?

सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल