अजूनही ३३ परीक्षांचे निकाल प्रतीक्षेत; विधि शाखेचे सर्व निकाल तयार

उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या घोळानंतर उच्च न्यायालयासमोर रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठी कबूल केलेली तिसरी मुदत पाळण्यातही मुंबई विद्यापीठाला अपयश आलेले आहे. मुदत संपुष्टात येण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना विद्यापीठाच्या ४७७ परीक्षांपकी ३३ परीक्षांचे निकाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या विद्यापीठाविरोधात उच्च न्यायालय कोणत्या कारवाईचा बडगा उगारणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान विधि शाखेचे सर्व निकाल तयार झाले असून बुधवारी रात्री उशिरा विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या निकाल रखडपट्टीमुळे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागलेल्या विधि व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांनी न्याय मिळवण्यासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निकालाच्या विलंबामुळे शैक्षणिक आणि नोकरीच्या संधीवर तर पाणी सोडावेच लागले आहे. परंतु या सगळ्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाची नुकसान भरपाई देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी याचिकेमध्ये केली आहे. त्याची दखल घेत सर्व निकाल कधीपर्यंत जाहीर करणार हे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने विद्यापीठाला बजावले होते. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम निकाल दिले जातील, अशी हमी खुद्द विद्यापीठानेच २४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीमध्ये दिली होती. परंतु गेल्या सहा दिवसांमध्ये विद्यापीठाला ४७७ परीक्षांपकी ४४४ परीक्षांचे निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे.

२५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयांना सुट्टी असल्याकारणाने गेले पाच दिवस मूल्यांकनाचे काम अजूनच संथगतीने सुरू होते. या पाच दिवसांमध्ये विद्यापीठाने २६ निकाल जाहीर केले असले, तरी या निकालांमधील त्रुटी निस्तरतानाच परीक्षा भवनामधील कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ जात आहे. आता फक्त एक दिवसाची मुदत शिल्लक असताना विद्यापीठापुढे ३३ परीक्षांच्या निकालाचे आव्हान आहे. ‘‘३१ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करू, असे विद्यापीठाने सांगितले होते. त्याप्रमाणे मागील काही दिवसांमध्ये महत्त्वाच्या अशा वाणिज्य आणि विधि शाखांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. आता काही छोटे निकाल शिल्लक आहेत. तेही लवकरात लवकर जाहीर करण्यात येतील. मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी परीक्षा भवनामध्ये मोजकेच कर्मचारी हजर राहू शकले आहेत. तरीही बुधवारी ७ निकाल जाहीर करण्यात आले आहेत,’’ असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांनी सांगितले आहे.

अडकलेल्या कर्मचाऱ्यांची रात्रपाळी

दुपारनंतर पावसामुळे उद्भवलेल्या बंद परिस्थितीतून घरी जाणे शक्य नसल्याने परीक्षा भवनातील सुमारे २०० कर्मचारी विद्यापीठातच अडकून राहिले. हे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत राहिल्यानेच बुधवारी ४ निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे, असे परीक्षा भवनातील सूत्रांकडून समजले आहे.