उद्दिष्ट ठरवून पेपर तपासणीचे काम सुरू

राज्यपालांनी केलेल्या कानउघाडणीनंतर पदवी परीक्षांचे निकाल ३१ जुलैपूर्वी जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने कंबर कसली आहे. टास्क फोर्सची नेमणूक, दिवसाला ठरावीक उत्तरपत्रिका तपासण्याचे उद्दिष्ट ठेवून उत्तरपत्रिका तपासणी, तपासणीसाठी हजारोंच्या संख्येत प्राध्यापकांची नेमणूक करून रखडलेली ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणी मार्गी लावण्यासाठी विद्यापीठाची धावपळ सुरू आहे.

ऑनलाइन पेपर तपासणी करण्याचा विद्यापीठाचा पहिलाच प्रयोग आहे. या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यामध्ये विद्यापीठाला पूर्णत: अपयश आले आहे. परीक्षा होऊन ४५ दिवस उलटले तरी ४२६ परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. अखेर राज्यपालांनी कानउघाडणी केल्यानंतर विद्यापीठातील यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. ३१ जुलैपर्यंतची मुदत आणि लाखो उत्तरपत्रिकांची तपासणी हे गणित जुळवून आणण्यासाठी विद्यापीठाकडून आता दिवसभराचे तपासणीचे उद्दिष्ट ठरवले जात आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाची कसरत होत आहे. गुरुवारी दिवसभरात ४० हजार पेपर तपासले गेले. पेपर तपासणीसाठी आता १ ते २ वर्षांचा अनुभव असलेल्या शिक्षकांनाही बोलावण्यात येत आहे. शुक्रवारी जवळपास साडेचार हजार शिक्षकांना बोलवण्यात आले. तर दिवसभरात ८० हजार ते एक लाखांपर्यंतचे पेपर तपासण्याचे उद्दिष्ट

होते. दिवसाकाठी या उद्दिष्टांमध्ये वाढ करून पेपर तपासणीच्या कामाला गती आणण्याचे काम सुरू आहे. या शिवाय टास्क फोर्स नेमण्यात आले असून त्यांच्या अंतर्गत सात विभागीय प्रमुख नेमण्यात आले आहेत. या प्रमुखांनी त्यांच्या विभागातील पेपर तपासणीला वेग येण्यासाठी कार्यक्षम असतील. तसेच प्राध्यापकांकडून अधिकाधिक पेपर तपासणी करून घेण्याचे उद्दिष्ट पार पाडण्यासाठी उपकुलसचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. प्राचार्य, विभागप्रमुख यांनाही उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर देखरेख करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन तपासणीचे सॉफ्टवेअर पुरवणाऱ्या कंपनीलाही तांत्रिक अडचणींबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत. पेपरच्या मॉडरेशनचे कामही सुरु झाले आहे. जवळपास १५ हजार मॉडरेटरची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी दिली.

मॉडरेशनचा किल्ला अद्याप बाकीच

पेपरच्या मॉडरेशनचे काम सुरू झाले असा दावा विद्यापीठाने केला असला तरी मॉडरेशनबाबत कोणत्याही सूचना न आल्याचे महाविद्यालयांकडून सांगितले जात आहे. एकूण पेपरच्या सुमारे ४० टक्केपेपरचे मॉडरेशन होते. तसेच एक पेपर तपासणीसाठी जेवढा वेळ लागतो तितकाच वेळ मॉडरेशनसाठी लागतो. पेपर तपासणीची पहिली पायरी आणि त्यानंतर मॉडरेशन यामुळे कामाचा आवाका खूप मोठा आहे. दरवर्षी आम्हाला किती पेपर तपासायचे आहेत, हे ठरवून दिलेले असते. परंतु ऑनलाइन पद्धतीमध्ये आम्ही किती पेपर तपासायचे आहेत, हेच आम्हाला समजलेले नाही. त्यामुळे दिवसभरात पडतील तितके पेपर आम्ही तपासत आहोत, असे एका प्राध्यपकांनी व्यक्त केले आहे.

इथे कारभार धीमाच

मुंबईबाहेरील बऱ्याच ठिकाणी पेपर तपासणीसाठी वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. दापोलीतील परीक्षा केंद्रावर प्राध्यापक दररोज पेपर तपासणीसाठी येत आहेत. परंतु तपासणीसाठी पेपरच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना काम न करताच परतावे लागत आहे. अजूनही तांत्रिक अडचणींचा गोंधळ सुरूच असल्यामुळे पेपर तपासताना अचानक दुसऱ्या विषयाचा पेपर प्राध्यापकांना मिळत आहे. दापोलीच्या मंडणगढमधील काही प्राध्यपकांची अजून पेपर तपासणीसाठी नोंदणीच झालेली नाही, असे समोर आले आहे.