करोना परिस्थितीमुळे सध्या अनेक क्षेत्रांच्या परिक्षा रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. अशातच आता विधी शाखेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर येत आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून हे सांगण्यात आलं आहे की, इथून पुढे परीक्षा घेण्यासंदर्भातली जून २०२० ची नियमावली लागू करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचा मे २०२० चा निकाल ग्राह्य धरण्यात येणार आहे.
न्यायमूर्ती रमेश धनुका आणि रियाझ चाग्ला यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट अमित साळे यांनी सांगितलं की, हा नियम आधीच्या नव्हे तर इथून पुढच्या विद्यार्थ्यांना लागू होईल. तसंच मुंबई विद्यापीठाने सांगितलं की ते त्यांचा ५ जुलै २०२१ रोजी काढलेला अध्यादेश रद्द करत आहेत. या अध्यादेशात सांगितलं आहे की, २२ मे २०२० रोजी लावण्यात आलेले विधी अभ्यासक्रमाच्या पदवीच्या सर्व सत्रांचे निकाल रद्द करण्यात येतील.

या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन अंतर्गत पद्धतीने होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बार कौन्सिलच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत. बार कौन्सिलने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीमुळे मुंबई विद्यापीठाला विधी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या आणि पाचव्या वर्षाचे निकाल रद्द करावे लागले होते. याच्या विरोधात सरकारी विधी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती.