१६० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यपीठाची गणना जगातल्या महाकाय शिक्षणतीर्थात होत असली, तरी सध्या ओढवून घेतलेल्या अनेक संकटांनी ही ज्ञानपोई आटायला लागली आहे. पुर्वी अखंड भारतात पाकिस्तानशी संलग्न असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या परीक्षाही इकडून पार पडत. त्यांचे निकाल सांगितलेल्या वेळी तंतोतंत त्याच तारखेला लागत स्वतंत्र भारतानंतर शिक्षणाचा आणि विद्यार्थी संख्येचा पसारा बळावला, राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अंतराच्या मुद्दय़ांवरून विद्यापीठांची विभागणीही झाली.अनेक विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय पटलावर नाव आले नाही तरी स्थानिक गरजेनुसार ज्ञानदाती झाली. परंतु, मुंबई विद्यापीठाला मूलभूत कामाचा आवाकाही गाठण्यात यश लाभले नाही.

गेल्या वर्षभरापासून मुंबई विद्यापीठ शिक्षणतीर्थाचे रूपांतर परीक्षातीर्थात झाले आहे. राज्यातली, देशातलीच नाही तर जगातील सारी विद्यापीठे गैरप्रकार आणि गोंधळाचे आगर असतील, पण कामाच्या संथगतीत मुंबई विद्यापीठाचा वेग अवर्णनीयच म्हणावा लागेल. निकालांच्या पातळीवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली की विद्यापीठाने, हा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या आहे. ऑनलाइन मूल्यांकन अर्थात पेपर तपासणीचे खूळ अपुरी यंत्रणा आणि अतिअक्षम कर्मचाऱ्यांच्या बळावर बळजबरी राबवल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षा निकालातील अभूतपूर्व दिरंगाईमध्ये उलटला. विद्यार्थ्यांचे वाया गेलेले वर्ष, बदललेले कुलगुरू या सगळ्या रगाडय़ात परीक्षा, शिक्षण आणि निकालांचे कोलमडलेले नियोजन अजून सावरायला तयार नाही. बसलेल्या घडीचे एखादे टोक हातून निसटावे आणि पुन्हा सगळी घडी विस्कटून जावी, अशी परिस्थिती सध्या विद्यपीठाची झाली आहे आणि परिस्थिती सावरायच्या ऐवजी अधिक अवघड होत चालली आहे.

उत्तरपत्रिका तपासणीत चूक प्राध्यापकांची, प्रशासनाची, कुलगुरूंची की मेरीटट्रॅक कंपनीची यावर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विद्यार्थी कैवारी संघटनांनी आपली पोळी भाजून घेतली. यात विद्यार्थ्यांचे नुकसान, त्यांना आणि पालकांना होणारा मानसिक त्रास याचे कुणालाही काही घेणे-देणे आहे का, असा प्रश्न पडावा असे चित्र सध्या उभे आहे. केवळ परीक्षांच्या निकालांमुळे मुलांची मानसिक स्थिती बिघडताना बघून हतबल झालेल्या पालकांचा विद्यापीठ यंत्रणेवरचा विश्वासच उडून जायला लागला आहे.

परीक्षांच्या वेळापत्रकापासून रोज कणाकणाने वाढणारा गोंधळ वरकरणी सावरण्याजोगा दिसत असला तरी प्रत्यक्षात अधिकच चिघळत गेला. गेल्या वर्षीचे निकाल जाहीर करण्यातच या शैक्षणिक वर्षांचे पहिले सत्र गेले. या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना ना ‘लेक्चर बंक’ करण्याचा आनंद मिळाला, ना कँटिनमध्ये टिवल्या-बावल्या करण्याचा पारंपरिक मजेचा भाग अनुभवता आला. डोक्यावर अभ्यास न होण्याच्या ओझ्यासोबत विद्यापीठ परीक्षांचे आणि निकालांचे जे काही भीषण प्रयोग राबविते, याची दहशतच त्यांच्या मनामध्ये दाटून राहिली. गेल्या सत्राच्या परीक्षा लांबल्या. आता हीच साखळी या सत्रातही कायम आहे. त्यामुळे या सत्राच्याही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ विद्यपीठावर आली आहे. गेल्या महिन्यापर्यंत विद्यापीठाच्या १२६ परीक्षांचे निकाल लागले नव्हते. त्या आकडय़ामध्ये निश्चितच मोठा बदल झाला असला, तरी पहिल्या परीक्षेचा निकाल न लागताच दुसरी परीक्षा देण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठाविषयी प्रेमाऐवजी अनादरच अधिक दाटून आलेला आहे.

निकालच हाती नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक संधी गमवाव्या लागल्या आहेत. निकालाचा, वेळापत्रकाचा गोंधळ सावरेलही, पण गमावलेला विश्वास कमावण्यासाठी आता विद्यापीठाला खूप मेहनत करावी लागणार आहे. सध्या निकाल गोंधळ सावरण्यासाठी फक्त परीक्षेकडे लक्ष केंद्रित केलेल्या प्रशासनाला इतरही अनेक बाबींकडे काटेकोरपणे पाहावे लागेल.

कुलगुरूंसमोर आव्हाने

येत्या आठवडय़ाभरात विद्यपीठाच्या नव्या कुलगुरूंची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पण येणारे कुलगुरू कुणीही असले, तरी त्यांच्या हातात जादूची छडी नसेल. अन् असली तरी सध्याच्या गोंधळाला ती अपुरीच ठरेल. कुलगुरूंसमोर सर्वात मोठे आव्हान असेल, ते शैक्षणिक, संशोधन क्षेत्रातील कामाबरोबरच प्रशासनावर वचक ठेवण्याचे. ते यशस्वी साधणारी व्यक्ती कुलगुरू होणे समर्पक ठरेल. मुंबई विद्यापीठातील राजकीय, सामाजिक समीकरणे, गटतट यांची जाण असलेले कुलगुरू हवेत, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. हे जरी खरे असले तरी आल्या आल्या त्यांना विद्यपीठ सध्या अडचणींच्या ज्या परीक्षा देत आहे, त्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहे. परीक्षार्थी विद्यापीठाचे ज्ञानतीर्थ स्वरूप पुन्हा झाले, तरच विद्यार्थ्यांसह पालकांची आज बनलेली निद्रानाशी प्रकृती सुधारेल, हे खरे.