नमुना उत्तरपत्रिकेची छायाप्रत करण्याचा विसर

सदोष प्रश्नपत्रिका, वेळापत्रकातील घोळ यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या गोंधळी कारभाराचा आणखी एक ‘नमुना’ तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या (टीवायबीकॉम) उत्तरपत्रिकेवरील परीक्षोत्तर चर्चेच्या निमित्ताने सोमवारी समोर आला आहे. फरक इतकाच की यावेळेस विद्यार्थ्यांऐवजी कुलाब्यापासून ते सिंधुदुर्गपर्यंतच्या महाविद्यालयांमधून विद्यापीठाच्या कलिना संकुलात जमलेल्या तब्बल ६०० प्राध्यापकांना या गैरकारभाराचा फटका सहन करत मनस्तापाला सामोरे जावे लागले.

टीवायबीकॉमच्या (पाचवे सत्र) उत्तरपत्रिकेवरील चर्चेसाठी म्हणून बोलविण्यात आलेल्या या बैठकीत प्रत्येक शिक्षकाला नमुना (मॉडेल) उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती (फोटोकॉपी) विद्यापीठाकडून मिळणे अपेक्षित होते. परंतु, फोटोकॉपी करण्यास विद्यापीठ विसरल्याने उत्तरपत्रिकेवरील चर्चेविना प्राध्यापकांना हात हलवत परतावे लागले. आता विद्यापीठातर्फे प्राध्यापकांना ई-मेलद्वारे नमुना उत्तरपत्रिका पाठविण्यात येणार आहे. मात्र, महाविद्यालयातील अभ्यासाचा एक दिवस मोडून सकाळी १० वाजल्यापासून विद्यापीठात जमलेल्या आम्हा शिक्षकांचा हा वाया गेलेला दिवस भरून कसा काढायचा, असा संतप्त सवाल प्राध्यापक वर्गाकडून विचारण्यात येत आहे. प्राध्यापकांना झालेल्या या मनस्तापाबद्दल खंत व्यक्त करण्याऐवजी विद्यापीठ अधिकारी धमकीवजा शब्दांतच प्राध्यापकांना वेळेत निकाल लावण्याबाबत सुनावत होते. त्यामुळे त्यांच्यात नाराजीची भावना आहे.

एकतर १० वाजता आयोजित बैठकीला विद्यापीठाचा एकही अधिकारी सुमारे सव्वा तास  फिरकला नव्हता. त्यामुळे, जमलेले प्राध्यापक आधीच वैतागून गेले होते. त्यात कलिना येथील ज्या मराठी भाषा भवनात ही बैठक बोलाविण्यात आली होती ते संकुल ६०० प्राध्यापकांना सामावून घेण्यास अपुरे होते. त्यामुळे बरेचशा प्राध्यापकांना बैठक संपेपर्यंत

म्हणजे दुपारी १२ वाजेपर्यंत उभेच राहावे लागले, अशा शब्दांत एका प्राध्यापकाने झालेल्या मनस्तापाचा पाढा वाचला.

नमुना उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपी नाहीत म्हणून चर्चेविनाच परत जाण्याची वेळ आली तेव्हा प्राध्यापकांच्या सहनशीलतेचा कडेकोट झाला होता. त्यात मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा मुजोरपणा इतका की, आम्हाला आधीच या बाबत सूचना दिली असती तर आमचा इतका दुरून येण्याचा त्रास वाचला असता, असे सांगणाऱ्या प्राध्यापकांना सरळ उत्तर देण्याऐवजी ‘तुमचे नाव काय’, म्हणून धमकीवजा सुनावण्यात येत होते. त्यामुळे कुणी नाराजीही व्यक्त करू शकले नाही, असे आणखी एका प्राध्यापकाने सांगितले.

नमुना प्रश्नपत्रिका छापण्यास विसरलेल्या  विद्यापीठाला प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम मात्र वेळेत पूर्ण करून हवे आहे. दिवस फारसे हाती नसल्याने आता तपासणीच्या कामाला लागा आणि २० दिवसात निकाल लावा, असेही बैठकीत विद्यापीठाकडून सुनावण्यात आल्यानंतर तर आम्ही कपाळाला हात लावला, अशा शब्दांत  प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली.

बैठकीला विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ आणि महाविद्यालये विकास मंडळा’चे (बीसीयूडी) संचालक अनिल पाटीलदेखील सहभागी झाले होते. या गोंधळाबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी तुम्हाला याची माहिती कुठल्या प्राध्यापकांनी दिली, असा प्रश्न केला. प्रतिनिधीने प्राध्यापकाचे नाव उघड करता येणार नाही, असे सांगितले. त्यावर तुम्ही प्राध्यापकाचे नाव सांगितले नाही तर मीही माहिती देणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

निकाल लावणार कधी?

विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका बसलेल्या प्राध्यापकांना आता निकालाची चिंता लागून राहिली आहे. दरवर्षी टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राची परीक्षा दिवाळीआधीच संपते. दिवाळीत उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपून सहावे सत्र सुरू होण्याच्या वेळेसच निकाल जाहीर केला जातो. यंदा ही परीक्षा दिवाळीनंतर म्हणजे २२ नोव्हेंबरला संपली आहे. त्यात २० दिवसात निकाल लावण्याचे उद्दिष्ट विद्यापीठाने ठेवल्याने वर्गावर शिकवायचे कधी आणि उत्तरपत्रिका तपासायच्या कधी, असा सवाल एका प्राध्यापकाने केला आहे.

जवळपास १० ते १२ पानांची नमुना उत्तरपत्रिका ६०० प्राध्यापकांना त्याचवेळी फोटोकॉपी करून देता येणे शक्य नसल्याने आता ती ई-मेलद्वारे पाठविली जाणार आहे. प्राध्यापकांच्या काही शंका असल्यास त्यांचे मेसेज किंवा ई-मेलद्वारे निरसन केले जाईल

– डॉ. सिद्धेश्वर गडदे , वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता