मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील सांस्कृतिक भवनात उभारण्यात येणार्‍या ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस अॅण्ड कल्चरल सेंटर’साठी वित्त विभागाने ८ कोटी ६० लाख रूपययांचा निधी मंजुर केला आहे. उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दिलेल्या मंजुरीमुळे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत याची घोषणा केली.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कला, संस्कृती आणि साहित्याचे केवळ प्रणेते नव्हते तर सिद्धहस्त प्रतिभाशाली कलावंत होते. शिवसेनाप्रमुखांचे समाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रांतील योगदान बहुमूल्य असून सर्वच जनसामान्यांची त्यांच्याप्रती आजही आदराची भूमिका आहे. व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कुंचल्यातून समाजातील विविध अनिष्ट प्रथांवर त्यांनी आसूड ओढले आहेत.‘मार्मिक’ सारख्या व्यंगचित्र साप्ताहिकामधुन संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाला प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठात उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक संकुलास ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस अॅण्ड कल्चरल सेंटर’ असे नाव देण्याची सुचना वायकर यांनी या अगोदरच विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली आहे.

फोर्ट येथील जहांगीर आर्टस गॅलरीमध्ये प्रदर्शन भरविण्यासाठी चित्रकारांना वर्षानुवर्षे वाट पहावी लागते. तर महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातील चित्रकारांना आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवता यावे, यासाठी विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस गॅलरी’ उभारण्यासाठी राज्यमंत्री वायकर यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमवेत बैठका घेतल्या. जहांगीर आर्टस गॅलरीच्या धर्तीवरच परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असणारी भव्य गॅलरी येथे उभारण्यात येणार आहे. कलिना येथील या सांस्कृतिक भवनात लोककला अकादमी, संगीत अकादमी, शाहीर अमरशेख अध्यासन, लोकशाहीर पठ्ठे बापुराव कलादालनही प्रस्तावित आहेत.

या सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्ती, नुतनीकरण, सौंदर्यीकरणासह आर्टस आणि कल्चरल सेंटर स्थापित करण्यासाठी विद्यापीठाच्या मदतीने प्रस्ताव तयार करुन तो वित्त विभागाकडे पाठविण्यात आला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्यात आली होती. त्यांनीही या कामासाठी आवश्यक असलेल्या ८ कोटी ५९ लाख ४७ हजार ४५५ इतक्या निधीला मंजुरी दिली. त्यानुसार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना ‘मा. बाळासाहेब ठाकरे आर्टस गॅलरी’ उभारण्याबरोबरच अन्य कामांसाठीच्या आवश्यक निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती विधानसभेत दिली.