आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेत आठ सुवर्ण पदके आणि सहा रौप्य पदकांची कमाई

मुंबई : विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘आविष्कार’ या आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेत आठ सुवर्ण पदके आणि सहा रौप्य पदकांची कमाई करत विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. सलग दुसऱ्या वर्षी मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेत बाजी मारली आहे.

समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ मिळावे या हेतूने तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी आविष्कार आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धा सुरू केली. यंदा १५ ते १८ जानेवारी या कालावधीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात ही १३वी आंतरविद्यापीठ आविष्कार स्पर्धा झाली. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने ५८ गुणांसह विजेतेपद पटकावले. मानव्यविद्या, भाषा, कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधि, मूलभूत शास्त्रे, शेती वपशू संवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र आणि औषधनिर्माण शास्त्र या विषय गटातून पदके पटकावली आहेत. विद्यापीठातील ४८ विद्यार्थ्यांचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता. कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, आविष्कार स्पर्धेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सिद्धिविनायक बर्वे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.

‘राज्यस्तरावर नावलौकिक’

संशोधनाच्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठाने केलेल्या या देदीप्यमान कामगिरीमुळे राज्यस्तरावर मुंबई विद्यपीठाचा नावलौकिक होतो आहे, याचा विशेष आनंद होत आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संशोधन, कल्पकतेच्या जोरावर आविष्कारसारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यपीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. संशोधनातून समाजजीवन कसे सुसह्य़ होऊ  शकेल यासाठी अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील संशोधन वृत्तीला चालना द्यावी. या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे शास्त्र पाहायला मिळत आहेत, असे कुलगुरू  डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले.