राज्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. संसर्गाचा वेग आणि बाधिताची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंध सैल करण्यास सुरूवात केली आहे. हे करत असताना राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला निर्बंध शिथिल करण्यास मार्गदर्शक ठरणारा कृती कार्यक्रम तयार केला आहे. निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच गट तयार केले असून, त्यात निकषानुसार जिल्ह्यांची वर्गवारी केली जाणार आहे. मुंबई या तिसऱ्या गटात असून, काही प्रमाणात निर्बंध शिथिल झाले आहेत. मात्र, लोकल बंद असल्याने काँग्रेसचे नेते संजय निरुमप यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे.

संजय निरुमप यांनी ट्वीट करत मुंबईतील निर्बंधांकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. “मुंबईमध्ये लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. पण, यामुळे लोकांना त्रासच जास्त होणार आहे. कार्यालये उघडली जात आहेत, पण सार्वजनिक वाहतूकच नाही. एकतर बसेसची संख्या वाढविण्यात यावी किंवा नियंत्रित प्रमाणात लोकल सुरू करण्यात यावी. नाहीतर लोक ऑफिसला कसे जाणार? वर्क फ्रॉम ऑफिसलाही एक मर्यादा आहे,” असं म्हणत निरुमप यांनी ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावलं आहे.

हेही वाचा – करोनाची दुसरी लाटही धारावी थोपवते तेव्हा…; दररोज एक ते दोन बाधितांची नोंद

मुंबई, पुणे, नाशिक, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र स्तर तीनमध्ये येत असल्याने अत्यावश्यक सेवेतील व इतर सारी दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत खुली राहतील. अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. मॉल्स, नाटय़गृहे बंदच राहणार आहेत. उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग सकाळी ५ ते ९ परवानगी असेल. खासगी कार्यालये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के उपस्थितीत सुरू राहतील. चित्रपट, मालिका चित्रीकरण जैव-सुरक्षा परिघात (बायो-बबल) करण्यास परवानगी असून, गर्दी जमेल अशा चित्रीकरणाला परवानगी नाही.

हेही वाचा – खबरदारी घेऊन अर्थचक्र सुरू ठेवण्यावर भर!; उद्योग-मनोरंजन क्षेत्राला मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन

मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकारी, आयुक्तांना सक्त ताकीद

राज्यात अजूनही करोनाचे आव्हान संपलेले नाही. लोकांना थोडा दिलासा देण्यासाठी निर्बंध शिथिल करताना जे निकष आणि पाच स्तर ठरविले आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना केली. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारंभात गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, नियमांचे उल्लंघन खपवून घेणार नाही, अशी ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिली.