हाऊसिंग सोसायटी, चित्रपट निर्मितीशी संबंधित कंपन्यांपाठोपाठ आता महाविद्यालयातही लसीकरण घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुंबई महापालिकेनंही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत हिरानंदानी हेरिटेज हाऊसिंग सोसायटीत घेण्यात आलेलं लसीकरण शिबीर बेकायदेशीर असल्याच दिसून आलं आहे. नागरिकांना देण्यात आलेली लस खरी होती का याची पडताळणी करण्यासाठी आता मुंबई महापालिकेनं सिरम इन्स्टिट्यूटला पत्र पाठवलं आहे.

मुंबईत शिबिरं आयोजित करून लस घोटाळा करणाऱ्या टोळीविरोधात नोंद गुन्ह्यांचा मुंबई पोलिसांकडून स्वतंत्रपणे तपास केला जाणार आहे. शनिवारी या टोळीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तर बोरिवलीतील आदित्य महाविद्यालयानेही या टोळीविरोधात लस घोटाळ्याची तक्रार केली. हळूहळू बोगस लसीकरण शिबिरं घेण्यात आल्याचे प्रकार मुंबईत समोर येऊ लागले आहेत. कांदिवली पश्चिममधील हिरानंदानी हेरिटेज हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी झालेला प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर मुंबई पोलिलांबरोबरच महापालिकेनंही यांची चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा- लसीकरण घोटाळा : बोरिवली पोलीस ठाण्यात आदित्य महाविद्यालयाकडून तक्रार

सोसायटीत लसीकरण शिबीर घेण्याऱ्या चार आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली असून, महापालिकेकडूनही या घटनेची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. सोसायटीत घेण्यात आलेलं शिबीर बोगस असल्याचं समोर आलं असून, नागरिकांना देण्यात आलेली लस खरी होती की खोटी याबद्दलची पडताळणीही महापालिकेनं सुरू केली आहे. आरोपींनी शिबिरांसाठी वापरलेली लस अवैध मार्गाने मिळवेली असल्याचं प्राथमिक चौकशीत आढळून आलं असून, महापालिकेनं लस उत्पादक सिरम इन्स्टिट्यूटला पत्र लिहिलं आहे.

३० मे रोजी हे लसीकरण शिबीर घेण्यात आलं होतं. १२ जून रोजी नागरिकांनी वाच्यता केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. १६ जून रोजी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांना दिले होते. शुक्रवारी चौकशी अहवाल सुरेश काकाणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर महापालिकेनं सिरम इन्स्टिट्यूटला पत्र पाठवलं आहे.

हेही वाचा- लसीकरण घोटाळा : नागरिकांना आवाहन करत आदित्य ठाकरे म्हणाले…

“महापालिकेनं सिरम इन्स्टिट्यूटला मेल पाठवला आहे. सिरमला पाठवण्यात आलेल्या पत्रात शिबिरात वापरण्यात आलेल्या लशींच्या वाईल्सचे नंबर पाठवण्यात आले आहेत. यामुळे कोणत्या रुग्णालयाने शिबिरासाठी लस पुरवल्या हे कळू शकेल. जर सिरमने रुग्णालयाचे नाव सांगितले, तर त्याच रुग्णालयाने हिरानंदानी सोसायटीमध्ये झालेल्या शिबिरासाठी लस पुरवल्या का याची माहिती महापालिका घेईल. यात जर रुग्णालयाने नकार दिला, तर महापालिका पोलिसांत जाईल. काळाबाजाराच्या अनुषंगाने याची चौकशी केली जाईल. लसीकरण केंद्रावरूनच या लसी शिबिरांसाठी पाठवल्या असण्याची शक्यता आहे,” अशी माहिती काकाणी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.