मुंबई विद्यापीठातील थिएटर ऑफ आर्टसचे संचालक योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. योगेश सोमण यांनी १४ डिसेंबर रोजी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि देशाच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर जी टीका केली त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून हा व्हिडीओ योगेश सोमण यांनी पोस्ट केला होता. मात्र या व्हिडीओवर एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेतला. तसंच सोमण यांना तातडीने निलंबित करावे अशीही मागणणी केली.

या सगळ्या घडामोडी घडल्या मात्र कारवाई झाली नाही. अखेर सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी नाट्यशास्त्र विभागात असलेल्या गैरसोयींविरोधात आंदोलन केलं. अनुभव नसलेले शिक्षक, लेक्चर न घेता अभ्यासक्रम पूर्ण करणे, नाट्यशास्त्र विभागात सोयी नसणे अशा तक्रारी या मुलांनी केल्या. या सगळ्यानंतर सोमवारी रात्री उशिरा योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं.

नाट्यशास्त्र विभागातील गैरसोयींविरोधात एनएसयूआय आणि छात्रभारती या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन तीव्र केलं. तसंच या आंदोलनात त्यांनी योगेश सोमण यांच्या निलंबनाचीही मागणी केली. या सगळ्या प्रकरणाबाबत विद्यापीठ सत्यशोधक समिती नेमणार आहे. पुढील कारवाई होईपर्यंत योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तोपर्यंत इतर प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवतील. दरम्यान समितीचा निर्णय पुढील चार आठवड्यात घेतला जाईल. नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन, तसंच एनएसयूआयची मागणी या सगळ्याचा विचार समिती करणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच विद्यापीठाकडून घेतला जाईल असं मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार अजय देशमुख यांनी स्पष्ट केलं.