मुंबई आणि विदर्भात पक्षवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा भर दिला असला तरी पक्ष स्थापनेपासून गेल्या १६ वर्षांमध्ये या दोन्ही विभागांमध्ये पक्ष बाळसे धरू शकलेला नसून, भविष्यातही पक्ष वाढविण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.
राष्ट्रवादीने पुढील निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. गेल्याच आठवडय़ात झालेल्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी मुंबई आणि विदर्भात पक्ष कमकुवत असल्याची कबुली देत या दोन्ही विभागांमध्ये पक्ष वाढविण्यावर भर दिला. गेल्या वर्षी विधानसभेत स्वबळावर लढताना मुंबई आणि विदर्भातील एकूण ९८ जागांमध्ये राष्ट्रवादीचा फक्त एक आमदार निवडून आला होता.  
प्रदेशाध्यक्षाबरोबरच मुंबई अध्यक्षांची निवड करण्यात येणार होती. पण मुंबईची धुरा कोणाकडे सोपवावी याबाबत अजूनही नेत्यांमध्ये एकमत झालेले नाही. मुंबईत २००९मध्ये एक खासदार आणि चार आमदार निवडून आल्याचा अपवाद वगळता राष्ट्रवादीला फार काही यश मिळालेले नाही. महापालिकेत जेमतेम दुहेरी आकडा गाठणे शक्य झाले आहे. छगन भुजबळ यांनी सुरुवातीला लक्ष घातले, पण पक्षांतर्गत कटकटींना कंटाळून त्यांनीही नंतर आपला मोर्चा नाशिककडे वळविला. सचिन अहिर, नरेंद्र वर्मा यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते, पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत मुंबईत यश मिळणे कठीण असल्याचे राष्ट्रवादीचे नेते मान्य करतात.
विदर्भात संतप्त भावना?
विदर्भात राष्ट्रवादीबद्दल काहीशी संतप्त भावना आहे. सत्तेत असताना विदर्भाच्या वाटय़ाचा निधी पश्चिम महाराष्ट्रात वळविण्यात आला होता. राष्ट्रवादीमुळेच निधीची पळवापळव झाली, असा आरोप झाला होता. पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यावर राष्ट्रवादीने सारी यंत्रणा कामाला लावली तसेच दौरे करून लोकांना बळ दिले. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने विदर्भाकडे पाठ फिरविली होती, असा आक्षेप विदर्भात राष्ट्रवादीबद्दल घेतला जातो.