News Flash

मुंबईकरांच्या पाण्याची बेगमी!

मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर, तानसा, विहार आणि तुळशी ओसंडून वाहू लागले आहेत.

तलाव ९० टक्के भरले; ३५० दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध

नाशिक आणि ठाणे जिल्ह्य़ामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात मुंबईकरांच्या पाण्याची बेगमी झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९० टक्के भरले असून आजघडीला तलावात मुंबईकरांना तब्बल ३५० दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध झाला आहे. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने हुलकावणी दिल्यास मुंबईकरांना वर्षअखेरीस पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर, तानसा, विहार आणि तुळशी ओसंडून वाहू लागले आहेत. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे मध्य वैतरणाही कोणत्याही क्षणी ओसंडून वाहण्याचा बेतात आहे. मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणामध्ये ३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ च्या सुमारास १३,१३,५२३ दशलक्ष लिटर पाणीसाठय़ाची नोंद झाली आहे. तलावांची वापरायोग्य पाणीसाठय़ाची क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर असून आजघडीला तलाव ९०.७५ टक्के भरले आहेत. उर्वरित दोन महिन्यांमध्ये ९.२५ टक्के म्हणजेच १,२३,५७८ दशलक्ष पाण्याची भर पडेल आणि सर्वच तलाव दुथडी भरून वाहू लागतील, असा विश्वास जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मोडकसागर आणि तानसा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे वैतरणा आणि तानसा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून नद्या धोकादायक पातळी ओलांडण्याच्या बेतात आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या परिसरात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

दादरमध्ये जलवाहिनी फुटली

दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पारसी जिमखान्याजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास जलवाहिनी फुटली आणि हजारो लिटर पाणी वाहून गेले. जलहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून सकाळच्या वेळी आसपासच्या काही विभागात पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला होता.

पारसी जिमखान्याजवळील १२०० मि.मी. जलवाहिनी बुधवारी पहाटे चारच्या सुमारास फुटली. जलवाहिनी फुटल्याचे वृत्त समजताच पालिकेच्या जल विभागातील अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे किंग्ज सर्कल ते लालबाग परिसरात बुधवारी सकाळी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पावसाचा अडथळा आला नाही, तर गुरुवारी सकाळपर्यंत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

water-chart

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 3:12 am

Web Title: mumbai water supply dam full
Next Stories
1 शासकीय भूखंड हडपण्यासाठी मंदिरांची उभारणी
2 राष्ट्रीय उद्यानातील नव्या वाघिणींचे बारसे
3 महापालिकेचा ग्रीस घोटाळा
Just Now!
X