गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे तानसा धरण भरून वाहू लागले होते. त्या पाठोपाठ आता मोडकसागर धरणही भरून वाहू लागले आहे. त्यामुळे आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये एकूण 64.14 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी मोडकसागर हे धरणही भरून वाहू लागल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. शहापूर तालुक्यात असलेल्या वैतरणा नदीवर मोडकसागर धरण आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी हे महत्त्वाचे धरण मानले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उशीरा हे धरण भरून वाहू लागले असले तरी मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, भातसा, विहार आणि तुलसी या धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. या सात धरणांपैकी तुलसी, तानसा आणि आता मोडकसागर ही तीन धरणे भरून वाहू लागली आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2019 7:26 pm