News Flash

लवकरच ‘वॉटर टॅक्सी’ची सफर

सामंजस्य करारांमुळे मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी वॉटर टॅक्सी सुविधा सुरू करण्यास चालना मिळाली आहे.

मुंबईतून वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, रेवसकडे झटपट प्रवास

मुंबई : मुंबईतून जलमार्गाने वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, रेवस आदी परिसरात झटपट पोहोचण्याचे मुंबईकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून ‘भारतीय सागरी परिषदे’च्या (इंडियन मेरिटाइम समिट) निमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि विविध कंपन्यांमध्ये याबाबत नुकतेच सामंजस्य करार करण्यात आले. परिणामी, येत्या काही महिन्यांतच नागरिकांना ‘वॉटर टॅक्सी’ची सफर घडणार आहे.

बंदर आणि सागरी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी ‘बंदर, नौवहन आणि जलमार्ग’ मंत्रालयाने २ ते ४ मार्च दरम्यान ‘भारतीय सागरी परिषदे’चे (मेरिटाइम इंडिया समिट) आयोजन केले आहे. ही परिषद आभासी पद्धतीने होणार असून, त्या निमित्ताने विविध सामंजस्य करार करण्यात येत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टने दोन दिवसांत एकूण सात हजार ५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून एकूण २० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिली.

या सामंजस्य करारांमुळे मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी वॉटर टॅक्सी सुविधा सुरू करण्यास चालना मिळाली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे या सेवेचे नियोजन केले जाणार असून ही सेवा खासगी चालकांमार्फत चालवली जाईल. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कॅटामरान, लाँच यांचा वापर करण्यात येईल, असे पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नेरुळ आणि बेलापूर येथे जेट्टीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. परिणामी पुढील दोन महिन्यांमध्ये तिथे ही सुविधा सुरू होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सेवेचे प्रवासभाडे किती असावे यासंदर्भात चर्चा सुरू आहे. ही सुविधा मुख्यत: रोजच्या दळणवळणासाठी असल्याने त्यानुसार त्याचे दरपत्रक निश्चित करण्याचा विचार आहे. ‘वॉटर टॅक्सी’ सुविधा देणाऱ्या कंपन्यांकडे कॉर्पोरेट क्षेत्रातून या संदर्भात मागणी केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

‘क्रूझ’संदर्भात करार

वॉटर टॅक्सीबरोबरच ‘क्रूझ’संदर्भात विविध करार करण्यात आले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल, बंदर परिसरातच क्रूझ भटकंती सेवा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर रो रो सेवेचा विस्तार काशिदपर्यंत करण्याबाबतचा सामंजस्य करारही करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच गुजरात ते महाराष्ट्र असा रो रो सेवेचा विस्तारही अपेक्षित आहे. याशिवाय जहाजांच्या दुरुस्तीसाठी तरंगत्या सुक्या गोदीची उभारणीही करण्यात येईल.

सेवा कशी असेल?

वॉटर टॅक्सीमधून मुंबई (प्रिन्सेस डॉक) ते  वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी रेवसदरम्यान प्रवास करता येणार आहे. तसेच मुंबई ते बेलापूर हे अंतर सुमारे तासाभरात कापता येईल. वॉटर टॅक्सीची क्षमता सुरुवातीला १० ते ५० प्रवासी इतकी असेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने १०० प्रवाशांपर्यंत क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:36 am

Web Title: mumbai water taxi trip indian maritime summit akp 94
Next Stories
1 जकात नाक्यांचा व्यावसायिक वापर
2 ८१४ मुंबईकरांवर खटले
3 विकासकांना घसघशीत सूट
Just Now!
X