मुंबईत वाढत असलेली करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शहरात वीकएंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत शहरात पूर्ण लॉकडाऊन लागू असेल. या काळात इतर गोष्टींसोबतच दारूची दुकानं देखील बंद ठेवण्याचे निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी पालिकेने या निर्बंधांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार, शहरात वीकएंड लॉकडाऊनदरम्यान देखील घरपोच दारू पोहोच करण्याची परवानगी दारू विक्रेत्यांना देण्यात आली आहे. मात्र, या काळात फक्त घरपोच दारूविक्रीच करता येईल, असं देखील पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

“आज आपण लॉकडाउनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या ….”

मुंबईत वीकएंड लॉकडाऊनचे कठोर नियम!

मुंबई महानगर पालिकेकडून याआधी लागू करण्यात आलेल्या वीकएंड लॉकडाऊननुसार बार, वाईनशॉप, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे लॉकडाऊनदरम्यान बंद राहतील. दुकाने, मॉल आणि मार्केट बंद राहतील. यातून जीवनावश्यक सेवा आणि चित्रपट तसेच मालिकांच्या चित्रीकरणाला सूट देण्यात आली आहे. मात्र, त्यांना करोनासंदर्भातले नियम पाळण्याचं बंधन घालून देण्यात आलं आहे. त्यासोबतच, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, वॉटर पार्क, क्लब, स्वीमिंग पूल, जिम, क्रीडा संकुले या काळात बंद राहतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

फक्त घरपोच दारूविक्रीची परवानगी

दरम्यान, या निर्बंधांमधून दारू विक्रीला काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. नव्या बदलानुसार वीकएंडच्या लॉकडाऊनदरम्यान दारू विक्री करण्यास परवानगी असेल. मात्र, ही दारूविक्री संबंधित विक्रेत्यांना देण्यात आलेल्या परवान्यानुसारच करता येईल. तसेच, फक्त घरपोच दारूविक्री करता येईल. यामध्ये होम डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तीने सोशल डिस्टन्सिंग आणि करोनासंदर्भातल्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.