मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर एसटी बसला अपघात झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. भरधाव बस अपघात होऊन उलटल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान, अपघातानंतर एसटी चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला, तर कंडक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुदैव म्हणजे या अपघातात कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली नाही.

द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव पुलावर रात्री हा अपघात झाला. बस दहिसर भागातून मुंबईच्या दिशेनं जात होती, अचानक ती रस्त्यावरच उलटली. अपघात घडला त्यावेळी बसमधून तीन जण प्रवास करत होते. यापैकी एक प्रवाशी जखमी झाला आहे. बस उलटल्यानंतर बसचा चालक घटनास्थळावरुन पसार झाला. तर पोलिसांनी कंडक्टरला ताब्यात घेतलं.

वाहनांची वर्दळ असलेल्या महामार्गावरच एसटी बस पलटी झाल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर उलटलेली बस रस्त्यावरुन हटवण्यात आली. मात्र, बस चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढल्यानं अपघात नेमका कशामुळे घडला, याचं कारण समजू शकलेलं नाही.