भारतातील सायकल संस्कृतीवर पुस्तक लिहिणाऱ्या अमेरिकन प्राध्यापकाचे मत

सकाळी ट्रिंग ट्रिंग करत येणारा पाववाला, पेपरवाला, शहरांच्या गर्दीतून वाट काढणारे डबेवाले किंवा हल्ली पूर्ण तयारीनिशी वेगात महागडय़ा सायकल हाकणारे वीर असोत, सायकल ही मुंबईसाठी नवीन नाही. शंभराहून अधिक वष्रे हे शहर या दुचाकीच्या बदलाचे आणि तिच्याविषयीच्या प्रेमाचे साक्षीदार आहे. तरीही सायकल संस्कृतीचा विषय निघाला की अमेरिका किंवा युरोपातील शहरांकडे बोट दाखवले जाते. अशावेळी भारतातील सायकल संस्कृतीचा कोणी अभ्यास करत असेल तर त्याची दखल घेणं आवश्यक ठरतं.

आपला देश सोडून जगभर फिरणारे अनेक सायकलस्वार आपण अधूनमधून भारतातही पाहतो. मात्र, केवळ भटकंती न करता अमेरिकेतील मॅसॅच्युसेट येथील ब्रँडिज विद्यापीठात मानववंशशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणारे जोनाथन शापिरो अंजारिआ गेले वर्षभर भारतातील सायकल संस्कृतीचा खूप जवळून अभ्यास करत आहेत. गेली १५ वष्रे जोनाथन दरवर्षी न चुकता भारतात येतायत. पण गेल्या ३-४ वर्षांमध्ये भारतातील सायकलींची वाढलेली संख्या आणि सायकलिंगकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन यामुळे त्यांनी वर्षभरापूर्वी भारतातील सायकल संस्कृतीचा अभ्यास करण्याचा आणि त्यावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये सायकलींची विक्री वाढली आहे. सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी शहरात आणि शहाराबाहेर कमी अंतराच्या व लांबपल्ल्याच्या सायकल सफरी मोठय़ा प्रमाणावर आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे वाढत्या सायकल संस्कृतीविषयी जगाला माहिती व्हावी हादेखील पुस्तकामागचा हेतू असल्याचे ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना ते म्हणाले. आपली सर्व निरीक्षणे सध्या ते ‘सायकल शेहेर – क्रॉनििक्लग इंडियाज सायकल कल्चर’ या ब्लॉगवरही नोंदवतात.

अमेरिकेसारख्या देशात रस्त्याच्या दुतर्फा पादचारी, सायकलस्वार, फेरीवाले यांना जागेचा हक्काचा विशिष्ट हिस्सा देण्यात आला असला, तरी चारचाकी किंवा मोठी वाहने चालवणा-यांना सायकलस्वार आपल्या वाटेचं हिरावून घेतायत असं वाटतं. मात्र मुंबईमध्ये रस्त्याची अशी काही ठरावीक वाटणी नसल्यामुळे सायकलस्वारांप्रति लोकांच्या मनात आदर दिसतो. त्यामुळे मुंबईत सायकल संस्कृती रुजवण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न केल्यास ती पुन्हा वेगात रुजेल, असं जोनाथन यांचं मत आहे. विशेष म्हणजे, वर्षभराच्या अभ्यासानंतर मुंबई हे सायकलींचे शहर होऊ शकते, असा ठाम विश्वासही त्यांना वाटतो.

सायकलस्वारांच्या अनुभवांची शिदोरी जमा करत असतानाच अभ्यासाच्या दृष्टीनेही काही नमुनेही जोनाथन गोळा करत आहेत. त्यामध्ये सायकलस्वारांचे अपघात ही महत्त्वपूर्ण आकडेवारी ते जमा करतायत. जेणेकरून अभ्यासाअंती त्यांचे संरक्षण आणि सुविधेच्या उपाययोजना करता येतील. डब्बेवाले, पाववाला, लहान सामानांची ने-आण करणारे, पेपरवाला, इस्त्री आणि लॉण्ड्रीवाला या सर्वासोबतही जोनाथन यांनी संवाद साधून त्यांचे सायकलिंगचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. खेदाची बाब म्हणजे, मुंबईसारख्या शहरात सायकलस्वारांना आवाज नसल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. सायकलकट्टा सारखं व्यासपीठ, फिरोजा सुरेश यांचा सायकल टू वर्क हा उपक्रम, फैजल ठाकूर, अनिल उचिल आणि मिर्झा गालिब बेग यांसारखी माणसं सायकलस्वारांच्या समस्या आणि मागण्या मांडण्याचं काम आपापल्यापरीने प्रामाणिकपणे करत आहेत, पण त्याला अधिकाधिक लोकांची साथ मिळण्याची आणि कामात सातत्य असण्याची आवश्यकता असल्याचं जोनाथन म्हणाले. पुस्तकाच्या निमित्ताने जोनाथन यांनी मुंबईसोबतच चेन्नई, मॅंगलोर, गुरगाव, राजस्थान, दिल्ली या शहरांना भेटी देऊन तेथील सायकलस्वारांशी भरपूर गप्पा मारल्या आहेत.

एकटय़ाने किंवा गटाने, विशिष्ट हेतूसाठी सायकल सफर करणाऱ्या अनेकांना ते भेटले आणि त्यांच्यासोबत सायकलिंग करून त्यांचे अनुभव शब्दबद्ध करण्याचे काम गेले वर्षभर करत आहेत. जोनाथन यांनी महिला सायकलस्वारांशीही आवर्जून संवाद साधलाय. त्यांच्या मुलाखतींमधून भारतातील कुठल्याही प्रदेशात आणि रस्त्यांवर सायकलिंग करणे सुरक्षित असल्याचे मत अनेकींनी मांडलेय.

गेली १५ वष्रे भारतात येणाऱ्या जोनाथन यांची पत्नी भारतीय वंशाची असून ते अस्खलितपणे िहदी बोलतात. मुंबईत असतानाही ते स्वत: रोज आपल्या मुलांसह सायकल चालवतात. त्यांचा मुंबईत सायकल चालवण्याचा अनुभव खूप चांगला असून सायकलस्वाराला नेहमीच मान मिळतो असं त्यांचं आजवरचं निरीक्षण आहे.

जोनाथनला वाटतं..

मुंबईच्या रस्स्त्यावरील पेवर ब्लॉक काढून टाकायला हवेत आणि त्याजागी सपाट रस्ते करायला हवेत. उघडी गटारे बंद करायला हवीत. रस्त्यांच्या कडेला केली जाणारी दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यावर रस्ता पूर्वस्थितीत आणायला हवा. सायकल पाìकगसाठी सार्वजनिक ठिकाणी आणि रेल्वे स्थानकांच्या बाहेर सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी.

पालिकेचाही सकारात्मक विचार

मुंबईतील रस्त्यांवर सार्वजनिक आणि खासगी गाडय़ा, पादचारी, फेरीवाले अशी सर्वाचीच गर्दी असते. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना जागा देण्याचा प्रयत्न करतो आणि तशी जागा सायकलस्वारांनाही मिळते. मात्र, काही विशिष्ट उपाययोजना केल्यास मुंबईमध्ये सायकलिंग करणं अधिक सुखावह होईल असं त्यांना वाटतं. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बठकीत, पालिकाही सायकलस्वारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करत असल्याची माहितीही जोनाथन यांनी बोलताना दिली.