मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना पुन्हा एकदा पहाटेची थंडी अनुभवायला मिळणार आहे.

उत्तरेकडे पडणारा पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात पुन्हा उकाडा परतणार असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे.

मुंबईत कमाल तापमानाचा पारा मागील काही दिवसांत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या तापमानामुळे घामाघूम झालेल्या मुंबईकरांना पुढील दोन ते तीन दिवस सकाळच्या गुलाबी थंडीचा आनंद घेता येईल. उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस पडत आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पहाटेच्या तापमानात घट होईल.

सध्या तापमान २०-२१ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून त्याचबरोबर किंचित प्रमाणात कमाल तापमानामध्येही घट होईल, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.