२०२०पासून ४७ वातानुकूलित लोकल आणणार

गेल्या वर्षभरापासून अडून राहिलेले वातानुकूलित रेल्वेचे गाडे अखेर नवीन वर्षांत रुळांवर येण्याची चिन्हे असतानाच, रेल्वे प्रशासनाने येत्या तीन वर्षांत आणखी वातानुकूलित लोकल मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे ठरवले आहे. मुंबईत येत्या काळात आकारात येत असलेल्या मेट्रोच्या जाळ्याशी स्पर्धा करताना लोकलचे प्रवासी दुरावले जाऊ नये, यासाठी रेल्वेने अधिकाधिक वातानुकूलित लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२० पासून टप्प्याटप्प्याने ४७ वातानुकूलित लोकल रेल्वेच्या ताफ्यात येणार असून यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

एप्रिल, २०१६ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल झाली. परंतु, या पहिल्यावाहिल्या वातानुकूलित गाडीला तांत्रिक अडचणींमुळे विलंबाचा ‘ब्रेक’ लागत आहे. विविध चाचण्यांमधून तावूनसुलाखून निघालेली ही लोकल आता १ जानेवारीपासून पश्चिम उपनगरीय प्रवाशआंच्या दिमतीला हजर होणार आहे. त्यानंतर पुढील तीन वर्षांत एकूण ४७ वातानकूलित लोकल उपनगरीय रेल्वे मार्गावरून चालवण्याचा विचार सुरू आहे.

या वातानुकूलित लोकलच्या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळाने २०१६ मध्येच मंजुरी दिली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या संथ कारभारामुळे गेले वर्षभर यावर काहीच कार्यवाही झाली नाही. मात्र, येत्या काळात मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोची सेवा सुरू होणार आहे. अशा वेळी लोकलच्या प्रवाशांनाही आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी एसी लोकलच्या योजनेला गती देण्यात येत आहे. २०१९मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी एसी लोकलच्या आगमनाचे चित्र मुंबईकर मतदारांसाठी सरकारबाबत आश्वासक वातावरण निर्माण करू शकते. त्यामुळेदेखील हा प्रकल्प आता वेगाने पुढे नेण्यात येत आहे. या माहितीला दुजोरा देत रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, या गाडय़ांसाठी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगितले.

दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया

मुंबईतील चाचणीत आलेल्या अडचणी टाळण्याचा प्रयत्न आहे. या गाडय़ांची चेन्नईतील रेल्वेच्या इंडियन कोच फॅक्टरीत (आयसीएफ) बांधणी केली जाणार असली तरी इतर तांत्रिक गोष्टी व कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहे. हे काम साधारण एक ते दोन महिन्यांत पूर्ण होईल. या गाडय़ा २०२० पासून टप्प्याटप्प्याने आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पश्चिम आणि मध्य अशा दोन्ही मार्गावर या गाडय़ा चालविण्याचा विचार आहे. या दोन हजार ८९९ कोटी रुपये किमतीच्या वातानुकूलित गाडय़ांच्या प्रकल्पाला नोव्हेंबर, २०१६मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली. यातील प्रत्येक गाडीची किंमत ६१ कोटी रुपये आहे. सध्या मुंबईत असलेल्या वातानुकूलित गाडीपेक्षा ही किंमत नऊ कोटी रुपयांनी अधिक असल्याचे सांगण्यात आले.

वातानुकूलित गाडय़ा चांगल्या असल्या तरी सध्याच्या घडीला प्रवासी क्षमता वाढवणे हे रेल्वेसमोर आव्हान आहे. सकाळी तीन तासांत व सायंकाळी साडेतीन तासांत एक लाख ८० हजार प्रवासी वाहून नेण्याची सध्याच्या लोकल गाडय़ांमध्ये क्षमता आहे. प्रत्यक्षात या वेळेत तीन लाख ६० हजार प्रवासी प्रवास करतात. या पाश्र्वभूमीवर वातानुकूलित लोकलमध्ये जादा प्रवासी नेता येतील का, याचा विचार व्हायला हवा.

– सुधीर बदामी, वाहतूकतज्ज्ञ