14 October 2019

News Flash

मुंबईत दशकभरातील विक्रमी थंडी

गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमानाची आकडेवारी

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमानाची आकडेवारी

मुंबई : मुंबई शहरात शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा २४ अंश सेल्सियसपर्यंत खाली असल्याने मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. सरासरीपेक्षा कमाल तापमानात जवळपास सहा अंश से.ने घट झाली आहे.

गेल्या दहा वर्षांत फेब्रुवारी महिन्यात प्रथमच तापमानाचा पारा इतका खाली गेला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे तापमानात घट झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. पुढील दोन दिवस कमाल तापमानासह किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या आठवडय़ात शहरातील कमाल तापमानाचा पारा ३५ अंश से.पर्यंत चढल्याने उन्हाळा परततोय का, या चिंतेच्या  झळा लागल्या होत्या. परंतु सोमवारपासून तापमानाचा पारा घसरायला सुरुवात झाली. गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांना शहरात सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. शुक्रवारी दुपारीदेखील थंड वारे वाहात होते. त्यामुळे दुपारपासूनच हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. शुक्रवारी सांताक्रूझ येथे २४.२ अंश से. कमाल तापामान नोंदले गेले, तर कुलाबा येथे २४.५ अंश से. नोंद झाली आहे. सांताक्रूझ येथे ६.९ अंश से.ने कमाल तापमानात घट झाली आहे, तर कुलाबा येथे ५.४ अंश से.ने तापमान कमी झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. गेल्या चार दिवसांत शहरासह उपनगरांमध्येही तापमान घट झाल्याने थंडी पुन्हा अवतरली आहे.

गेल्या दहा वर्षांत फेब्रुवारी महिन्यातील कमाल तापमान २६ अंश से.पर्यंत खाली आले होते. परंतु या वर्षी ते २४ अंश से.पर्यंत खाली आल्याने विक्रमी नोंद झाली आहे. २०१२ मध्ये ९ फेब्रुवारीला २६.५ अंश से.पर्यंत तापमान खाली आल्याची नोंद आहे. त्यानंतर २०१३ मध्ये ७ फेब्रुवारीला २७.५ पर्यंत कमाल तापमानात घट झाली होती.

कमाल तापमानासह किमान तापमानातही घट झाली आहे. शुक्रवारी कुलाबा येथे १७.६ अंश से. किमान तापमानात घट नोंदली आहे. सांताक्रूझ येथे १७.६ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली.

गेल्या आठवडय़ात पूर्वेकडील गरम वाऱ्यांमुळे कमाल तापमानात वाढ झाली होती. परंतु मंगळवारपासून उत्तरेकडील थंड वारे वायव्येकडे वाहात असल्याने देशभरात थंडी पुन्हा सुरू झाली आहे. वाऱ्यांच्या दिशाबदलाने दिवसा आणि रात्रीही या पुढील दोन दिवस तापमानात घट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

वर्ष           कमाल तापमान

(सर्वात कमी)

२०१८       २८.३ (१३ फेब्रुवारी)

२०१७     २७.९ (७ फेब्रुवारी)

२०१६     २७.७(१२ फेब्रुवारी)

२०१५    २८.७ (२८ फेब्रुवारी)

२०१४     २६.३ (१६ फेब्रुवारी)

 

वर्ष                कमाल तापमान

(सर्वात कमी)

२०१३         २७.५ (७ फेब्रुवारी)

२०१२         २६.५ (९ फेब्रुवारी)

२०११         २८.२ (१९ फेब्रुवारी)

२०१०         २८.७ (१२ फेब्रुवारी)

२००९         २९.५ (६ फेब्रुवारी)

First Published on February 9, 2019 4:05 am

Web Title: mumbai winter breaks a ten year temperature record