नालासोपारा रेल्वे स्थानकावरील पुलावर एका २६ वर्षीय महिलेने रविवारी सकाळच्या सुमारास बाळाला जन्म दिला. स्टेशन मास्तर आर. के. मीना आणि स्थानकावरील अन्य महिला कर्मचाऱ्यांनी या महिलेला प्रस्तुसाठी मदत केली.

सकाळी नऊच्या सुमारास गरोदर असणारी रेश्मा मोहम्मद ही महिला नालासोपारा स्थानकावरून कांदिवली येथील रुग्णालयात तपासणीसाठी जात होती. त्यावेळी स्टेशनवरील पूल चढताना या महिलेने पोटात कळा सुरु झाल्याची तक्रार केली. यासंदर्भात स्टेशन मास्तर मीना यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ १०८ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करुन डॉक्टरांना याबद्दलची माहिती दिली.

रेश्मा यांना थोडे सुद्धा चालणे शक्य होत नसल्याने स्टेशनवरील डॉक्टरांच्या मदतीने मीना आणि इतर कर्मचाऱ्यांनी पुलावरच रेश्मा यांची प्रस्तूती करण्याचा निर्णय घेतला. महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेश्माने पुलावरच बाळाला जन्म दिला. नंतर रेश्मा आणि तिच्या मुलाला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नालासोपारा रेल्वे स्थानकावरील वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे स्थानकावर त्यावेळेस उपस्थित असणाऱ्या दोन डॉक्टरांनीही यावेळी मदत केली. महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने पूलाचा काही भाग बंद करण्यात आला. यामध्ये अगदी स्टेशन मास्तरपासून ते सफाई कर्मचारी महिलांनीही मदत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रेश्मा आणि तिचा लहान मुलगा दोघेही सुरक्षित असल्याची माहिती रेश्माच्या कुटुंबियांनी दिली.